
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामना 8 मार्च रोजी पार पडला. न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली. टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची सलग दुसरी आणि एकूण तिसरी वेळ ठरली. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. बीसीसीआयकडून 11 मार्च रोजी आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एकूण 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने फक्त पहिल्या टप्प्यात 20 सामन्यांचंच वेळापत्रक जाहीर केलं.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, 28 मार्चपासून 19 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. तर पहिल्या टप्प्यात 16 दिवसांत 20 सामने खेळवण्यात येणार आहे. मात्र उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक केव्हा जाहीर केलं जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं. आता रविवारी 15 मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 19 व्या मोसमातील उर्वरित वेळापत्रकाची प्रतिक्षा आहे. मात्र निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने बीसीसीआयच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने बीसीसीआयला 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकात बदल करावा लागणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 9 एप्रिलला आसामध्ये मतदान होणार आहे. आसामध्ये एकूण 126 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात 7 एप्रिल रोजी आसामामधील गुवाहाटीत सामना नियोजित आहे.
एकूण 10 शहरांमधील स्टेडियममध्ये आयपीएलच्या 19 व्या मोसमातील सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये आसाममधील बारसपारा क्रिकेट स्टेडियमचाही समावेश आहे. राजस्थान रॉयल्सचं हे दुसरं होम ग्राउंड आहे. या स्टेडियममध्ये पहिल्या टप्प्यातील 3 सामने नियोजित आहे. हे तिन्ही सामने संध्याकाळी होणार आहेत.
पहिला सामना, 30 मार्च, राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
दुसरा सामना, 7 एप्रिल, राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
तिसरा सामना, 10 एप्रिल, राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी
मतदान 9 एप्रिलला होणार म्हटल्यावर 7 एप्रिलपासूनच मतदानाचं वातावरण तयार होतं. मतदानाच्या काही तासांआधी प्रचाराच्या तोफा थंडावतात. तसेच निवडणुकीनंतरचा दुसरा आणि मतमोजणीचा दिवसही सुरक्षेचा दृष्टीने महत्त्वाचा आणि आव्हानात्मक असतो. त्यामुळे आता बीसीसीआयकडून 19 व्या मोसमातील 7 आणि 10 एप्रिलला होणाऱ्या सामन्यांबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.