IPL 2026 : सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार बदलणार! चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडतंय?
आयपीएल स्पर्धेची रंगत प्रत्येक सामन्यानंतर वाढत चालली आहे. टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार बदलला जाण्याची शक्यता वाढली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा संघ पाच सामने खेळला असून त्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इशान किशनच्या नेतृत्वात संमिश्र कामगिरी झाली आहे. आता 18 एप्रिलला सनरायझर्स हैदराबादचा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्ससोबत होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी कर्णधार बदलाच्या घडामोडींना वेग आला आहे. त्याला कारणही तसंच आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स परतण्याची शक्यता आहे. पॅट कमिन्सची बुधवारी फिटनेस टेस्ट होणार आहे. यात पास झाल्यानंतर लगेचच भारतात परतण्याची शक्ता आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, पॅट कमिन्स 17 एप्रिलला भारताय येण्याची शक्यता आहे. सर्वकाही ठीक असल्यास 18 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघात खेळण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज गेल्या जुलैपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला नाही. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये एक एशेस कसोटी सामन्यात खेळला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्रास जाणवून लागल्याने मैदाना सोडलं. पॅट कमिन्स 27 मार्च रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी एसआरएच संघात सामील झाला होता. परंतु कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर अंतिम तपासणीसाठी 4 एप्रिल रोजी मायदेशी परतला. आता बुधवारी काय घडते याकडे लक्ष असणार आहे.
पॅट कमिन्स चाचणी उत्तीर्ण होण्याची आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा नेतृत्व आणि गोलंदाजीचा प्रश्न सुटणार आहे. कर्णधारपदाची धुरा पॅट कमिन्सच्या खांद्यावर गेल्यानंतर इशान किशनला मनमोकळेपणाने खेळता येईल. सध्या इशान किशन फॉर्मात आहे. पण कर्णधारपदाचा भार त्याच्या खांद्यावर स्पष्टपणे जाणवत आहे. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत त्याच्या खांद्यावर ही धुरा सोपवण्यात आली होती. पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, सर्व काही सुरळीत पार पडल्यास त्याला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळण्याची आशा आहे.