आरसीबीच्या सामन्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार, कँटिनमध्ये काम करणाऱ्यावर खळबळजनक आरोप
आयपीएल 2026 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर या स्पर्धेत उलथापालथ होताना दिसत आहे. आरसीबीने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. पण आरसीबी चाहत्यांची लाखो रूपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. चला जाणून घेऊयात काय झालं ते...

गजविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ यंदाच्या पर्वातही चमकदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबी 8 गुण आणि +1.503 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा उंचावल्या आहेत. पण संघाची कामगिरी जबरदस्त होत असताना चाहत्यांची मात्र लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. चिन्नास्वामी कँटीनमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला आरसीबी सामन्यांच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने जवळपास 180 तिकिटांचा काळाबाजार केल्याचं उघड झालं आहे. तिकीटं 15 ते 19 हजारांना विकत होता. आरोपी स्टेडियम परिसरातील कॅन्टीनमध्ये काम करत होता आणि काळ्या बाजारात तिकिटे विकत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
तिकिटांची विक्री करून लाखो कमावले
आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान आरसीबी सामन्यांच्या तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपीचं नाव चंद्रशेखर आहे. त्याने सामन्याची लोकप्रियता पाहून तिकिटांचा काळाबाजार केला. आरोपी तिकिटं कशी बशी उलथापालथ करून मिळवत होता. तसेच ती तिकीटं अधिक किमतीने विकत होता. रिपोर्टनुसार, त्याला सीसीयूने (केंद्रीय गुन्हे शाखेने) अटक केली आहे. त्याच्यासोबत आणखी काही जण असल्याचं संशय आहे. आरोपीने 180 तिकीटं 15 ते 19 हजारांना विकली आहेत. त्यातून त्याने 25 लाखांहून अधिकची कमाई केली आहे. आरोपीने 28 मार्चला झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याची तिकिटे विकली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे वेगवेगळ्या श्रेणींची तिकिटे होती आणि या दरम्यान त्याच्याशी अनेक जण संपर्कात होते. अवैध तिकीट विक्री करण्यासाठी मोबाईल फोनद्वारे थेट खरेदीदारांशी संपर्क साधत होता. आरसीबी संघाचा मोठा चाहता वर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून चाहते संघाला प्रोत्साहन देत होते. मागच्या वर्षी म्हणजेच 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आरसीबीने जेतेपद मिळवलं. यंदाही संघाची कामगिरी चांगली असून संघाला प्रोत्साहान देण्यासाठी चाहते मैदानात हजेरी लावत आहेत. असं असताना त्यांना तिकीट मिळत नसल्याने संताप होत होता. आता त्या मागची कारणंही समोर येत आहेत.