बीसीसीआयने दिली होती मोठी ऑफर, पण काय झालं? त्याबाबत जसप्रीत बुमराहने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह ट्रम्प कार्ड असणार आहे. असं असताना या मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराहने एक मोठा खुलासा केला आहे. बीसीसीआयने मोठी ऑफर दिली होती पण का नाकारली ते सांगितलं.

बीसीसीआयने दिली होती मोठी ऑफर, पण काय झालं? त्याबाबत जसप्रीत बुमराहने केला खुलासा
जसप्रीत बुमराह
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 17, 2025 | 9:10 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यापासून करणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून भारतीय संघ सुरुवात करणार आहे. ही मालिका सर्वार्थाने टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीची उणीव भासणार आहे. तर जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. कर्णधार शुबमन गिलला जसप्रीत बुमराहकडून फार अपेक्षा असतील यात काही शंका नाही. पण त्याची दुखापत पाहता वर्क लोड मॅनेजमेंट करणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. असं असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठा खुलासा केला आहे. बुमराहच्या खांद्यावर कसोटी संघाची धुरा का सोपवली नाही याबाबत त्याने सत्य समोर आणलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने कर्णधारपदासाठी जसप्रीत बुमराहचा विचार केला होता. पण जसप्रीत बुमराहने ही जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. कारण त्याने फिटनेस आणि टीमला प्राधान्य देणं महत्त्वाचं समजलं.

जसप्रीत बुमराहने स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेण्यापूर्वी आयपीएल दरम्यान माझ्यासोबत बीसीसीआयने चर्चा केली होती. मी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वर्कलोड मॅनेजमेंटबाबत सांगितलं. तसेच माझ्या पाठीची काळजी घेणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर असा निष्कर्ष काढला की मला थोडं अधिक स्मार्ट व्हावं लागेल. त्यानंतर मी बीसीसीआयला फोन केला आणि सांगितलं की मी कर्णधारपदासाठी तयार नाही. कारण मी सर्व कसोटी सामने खेळू शकणार नाही. बीसीसीआय मला कर्णधार म्हणून पाहात होती. पण मी त्यांना नकार दिला कारण कोणी कर्णधारपद भूषवत असेल तर असं वागणं योग्य ठरणार नाही. तीन कसोटी सामन्यात नेतृत्व करायचं आणि नंतर दुसऱ्याकडे सोपवायचं हे काही योग्य नाही. हे संघासाठी चांगलं नाही. संघाचं हित लक्षात घेणं गरजेचं होतं.’

जसप्रीत बुमराह हा पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. 2022 ते 2023 या वर्षात क्रिकेट मैदानापासून दूर होता. त्यानंतर जोरदार कमबॅक केलं. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत चांगली कामगिरी केली. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं. त्यामुळे शेवटच्या सामन्यात मध्यातच सामना सोडून जावं लागलं. इतकंच काय तर चॅम्पियन्स ट्रॉफीतही खेळू शकला नाही. अशात भविष्याच्या दृष्टीकोनातून बुमराह जोखिम घेऊ इच्छित नाही. तसेच संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू इच्छित आहे.

Follow Us