आशिया कपसाठी भारताचा संघ जाहीर! वडिलांनी गाजवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आता मुलांची वेळ; सेहवाग-द्रविडच्या लेकांची संघात एन्ट्री
U19 Asia Cup 2026 India U19 Squad: एसीसी पुरुष 19 वर्षांखालील आशिया कप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट समितीने या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड केली आहे.

ज्युनियर क्रिकेट समितीने 5 ते 14 नोव्हेंबर दरम्यान ओमानमधील मस्कत येथे होणाऱ्या एसीसी पुरुष अंडर-19 आशिया कपसाठी 15 सदस्यीय भारतीय अंडर-19 संघाची घोषणा केली आहे. भारताला ‘अ’ गटात संयुक्त अरब अमिरात, नेपाळ आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यासोबत स्थान देण्यात आले आहे. ‘अ’ आणि ‘ब’ गटातील (बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मलेशिया) अव्वल दोन संघ 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. तर अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
भारत आपल्या मोहिमेची सुरुवात 6 नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध करणार आहे. त्यानंतर 8 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि 10 नोव्हेंबरला युएईविरुद्ध सामने होतील. लक्ष्य रायचंदानीला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर यशवर्धन सिंग चौहान उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल. भारताचे माजी महान सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवाग याची भारतीय 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे.
आर्यवीरने अलीकडील देशांतर्गत 19 वर्षांखालील स्पर्धा आणि इंडिया ‘अ’ संघाच्या सामन्यांमध्ये आपल्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीने लक्ष वेधून घेतले होते. आपल्या वडिलांप्रमाणेच स्फोटक धावा करण्याची क्षमता असलेल्या आर्यवीरने अलीकडील सामन्यांमधील आपल्या प्रभावी कामगिरीने निवडकर्त्यांचा विश्वास संपादन केला आहे. या आशिया कपमध्ये भारताची आघाडीची फळी मजबूत करण्याची जबाबदारी आर्यवीरवर असेल.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविड याची संघात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवड झाली आहे. देशांतर्गत आणि भारत U19 सराव सामन्यांमध्ये अन्वयने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने आणि यष्टीमागील अप्रतिम यष्टीरक्षणाने सर्वांना प्रभावित केले. आपल्या वडिलांप्रमाणेच तंत्रशुद्ध आणि संयमी शैलीने खेळणाऱ्या अन्वयने दबावाखाली महत्त्वपूर्ण खेळी करून संघात आपले स्थान पक्के केले आहे.
भारतीय संघ – लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, यशवर्धन सिंग चौहान (उपकर्णधार), कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), रजत बघेल (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, आर्यन सावसानी, मोहित उलवा, काव्या पटेल, शविन विनोद, इशान सूद.
