
भारतीय क्रिकेट संघाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड सोबत होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्माने लौकिकेला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्याला अंतिम सामन्यातून बाहेर बसवण्याची मागणी केली जात आहे. अशातच यावर आता माजी कर्णधार कपिल देव यांनी अभिषेक शर्मा आणि टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटले की, ‘भारतीय संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये खराब फॉर्म असला तरी अभिषेक शर्माचा समावेश करावा. अभिषेकला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल की, तो खेळू शकतो आणि तो खेळेल.’ टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला सल्ला देताना त्यांनी म्हटले की, ‘तुमच्या संघावर विश्वास ठेवा आणि व्यवस्थापनाला खेळाडूवर विश्वास ठेवावा लागेल.’
इंग्लंडविरूद्धच्या सेमीफायनल मध्ये भारताने 250 पेक्षा जास्त धावा करूनही केवळ 7 धावांनी विजय मिळवला होता. यावर बोलताना कपिल देव म्हणाले की, सामना इतका क्लोज होईल अशी अपेक्षा नव्हती. भारताने 250 पेक्षा जास्त धावा केल्यानंतर मला वाटले होते की कोणतीही अडचण येणार नाही. हा एक उत्तम सामना होता. विजयाबद्दल भारताचे अभिनंदन, पण शेवटी क्रिकेट जिंकले. मी हा सामना खूप एन्जॉय केला.’
पुढे बोलताना, कपिल देव म्हणाले की, “बुमराह हा जगातील नंबर वन गोलंदाज आहे. तो सर्वोत्तम आहे कारण तो दबावाखाली चांगली कामगिरी करतो.” सलामीवीर संजू सॅमसनचे कौतुक करताना कपिल देव म्हणाले की, “तो एक हुशार क्रिकेटपटू आहे. कधीकधी मोठ्या खेळाडूंना वाईट काळाचा सामना करावा लागतो, जसे अभिषेक आता सामना करत आहे, परंतु जर ते मोठे खेळाडू असतील तर ते कमबॅक करतील. संजूने गेल्या दोन सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.”