IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या चौघांना विक्रमाची संधी, केएल-पंतच्या कामगिरीकडे लक्ष
India vs England Test Series Record : इंग्लंड दौऱ्यातून शुबमन गिल आणि ऋषभ पंत ही जोडी कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून पदार्पण करणार आहेत. या दोघांसह आणखी दोघांना या दौऱ्यात खास विक्रम करण्याची संधी आहे.

टीम इंडियाच्या चाहत्यांची अवघ्या काही तासांमध्ये प्रतिक्षा संपणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. हा सामना हेडिंग्ले, लीड्समध्ये खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन या तिघांनी निवृत्ती घेतल्याने ते आता दिसणार नाहीत, त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र युवा खेळाडूंची कामगिरी पाहण्याची उत्सुकताही चाहत्यांना आहे. कॅप्टन शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच या मालिकेत उपकर्णधार ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना विक्रम करण्याची संधी आहे.
केएल राहुलला 435 धावांची गरज
रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर अश्विन यांच्या कसोटी निवृत्तीानंतर आता केएल राहुल टीम इंडियाच्या प्रमुख आणि आणि अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. केएलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 435 धावांची गरज आहे. केएल या मालिकेतील सर्व सामने खेळला तरीही त्याला 10 डावांमध्ये खेळण्याची संधी मिळेल. त्यानुसार केएलला प्रत्येकी डावात किमान 43 धावा कराव्या लागतील. केएलने इंग्लंड लायन्स विरूद्धच्या अनऑफिशियल टेस्टमधील दोन्ही डावात अनुक्रमे 116 आणि 51 धावा केल्या. केएलने आतापर्यंत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 215 सामन्यांमध्ये 8 हजार 565 रन्स केल्या आहेत. केएलने या दरम्यान 17 शतकं आणि 57 अर्धशतकं झळकावली आहेत.
ऋषभ पंत
ऋषभ पंत याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीय. पंतला इंग्लंड दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. पंतने आतापर्यंत टेस्टमध्ये 43 सामन्यांमध्ये 2 हजार 948 धावा केल्या आहेत. पंतने कसोटी कारकीर्दीत एकूण 6 शतकं झळकावली आहेत. पंतने यापैकी 2 शतकं इंगलंडमध्ये लगावली आहेत. त्यामुळे पंतकडून इंग्लंड विरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
रवींद्र जडेजा
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याला 7 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याची संधी आहे. जडेजाला त्यासाठी 309 धावांची गरज आहे. जडेजाने टी 20I, वनडे आणि टेस्टमध्ये मिळून एकूण 358 सामन्यांमध्ये एकूण 6 हजार 691 रन्स केल्या आहेत. जडेजाने कसोटी कारकीर्दीत 4 शतकं आणि 35 अर्धशतकं लगावली आहेत.
मोहम्मद सिराज विकेट्सचं द्विशतकाच्या जवळ
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज 200 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. सिराजने आतापर्यंत 96 सामन्यांमध्ये 185 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. सिराजने इंग्लंडमध्ये 11 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे मोहम्मद सिराजची इंग्लंड विरुद्धची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
