LSG vs MI : मुंबई इंडियन्सला मोठा झटका, रोहित शर्मा आऊट, खरंच दुखापत की पत्ता कट?
Lucknow Super Giants vs Mumbai Indians Playing 11 : लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यातून मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा बाहेर झाला आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. मुंबईचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा हा लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. मुंबई विरुद्ध लखनौ यांच्यातील सामन्याचं आयोजन हे भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी स्टेडियम, लखनौ येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हार्दिक पंड्या याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकने या दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. रोहितला दुखापतीमुळे मुकावं लागल्याचं हार्दिकने स्पष्ट केलं आहे.
हार्दिक पंड्या काय म्हणाला?
रोहित शर्माला सराव करताना गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे रोहित या सामन्यातून बाहेर झाला आहे”, अशी माहिती हार्दिकने टॉसनंतर दिली. मात्र रोहितला खरंच दुखापत झालीय का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्यामागे कारणही तसंच आहे. मुंबईचा हा 18 व्या मोसमातील चौथा सामना आहे. रोहित पहिल्या 3 सामन्यात सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे रोहितला दुखापतीच्या नावाखाली संघातून बाहेर केलंय का? अशी चर्चाही क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगली आहे.
मुंबईकडून एकाला पदार्पणाची संधी
मुंबई टीम मॅनेजमेंटने एका खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे. राज अंगद बावा याचं पदार्पण झालं आहे. राज ऑलराउंडर आहे. राजने आतापर्यंत 11 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 42 पेक्षा अधिकच्या सरासरीने 633 धावा केल्या आहेत. तसेच 13 विकेट्सही घेतल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला लखनौने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. सिद्धार्थ याच्या जागी आकाश दीप याला संधी देणयात आली आहे.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप आणि आवेश खान.
लखनौ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेअर: रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद, एम सिद्धार्थ आणि आकाश सिंग.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर आणि विघ्नेश पुथूर.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेअर : तिलक वर्मा, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिन्झ, सत्यनारायण राजू आणि कर्ण शर्मा.
