Cricket : सूर्यकुमारशिवाय टीम खेळणार, यशस्वीचा समावेश, संघ जाहीर, सामना कधी?

Suryakumar Yadav : एमसीएच्या निवड समितीने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. एमसीएने या संघात यशस्वी जैस्वाल याचा समावेश केला आहे. तर दुखापतीनंतर नियमित कर्णधार शार्दूल ठाकुर याचं पुनरागमन झालं आहे.

Cricket : सूर्यकुमारशिवाय टीम खेळणार, यशस्वीचा समावेश, संघ जाहीर, सामना कधी?
Suryakumar Yadav Team India
Image Credit source: Getty Images
| Updated on: Feb 02, 2026 | 6:43 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला काही दिवस बाकी आहेत. टीम इंडियाने 7 फेब्रुवारीपासून होणाऱ्या या स्पर्धेसाठी जोरात सरावाला सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत आता उपांत्य पूर्व अर्थात क्वार्टर फायनल फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. हे 8 संघातील 4 सामने एकाच दिवशी 6 फेब्रुवारीला होणार आहेत. क्वार्टर फायनलसाठी एमसीएकडून मुंबई क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई संघात या सामन्यातून 2 खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. निवड समितीने या निर्णायक सामन्यासाठी कुणाला संधी दिलीय? हे जाणून घेऊयात.

सूर्यकुमार यादव देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. मात्र टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे सूर्यासोबत ऑलराउंडर शिवम दुबे या दोघांची या सामन्यासाठी निवड करण्यात आलेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्व करणाऱ्या शिवम दुबेचीही वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आलीय. अशात मुंबई सूर्या आणि शिवम या दोघांशिवाय उपांत्य पूर्व फेरीत खेळताना दिसणार आहे.

कॅप्टन शार्दूलचं कमबॅक

एमसीएने जाहीर केलेल्या 16 सदस्यीय संघात कर्णधार शार्दूल ठाकुर याचं पुनरागमन झालं आहे. शार्दूलला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावं लागलं होतं. तसेच यशस्वी जैस्वाल याला संधी देण्यात आली आहे. यशस्वीने आपण या सामन्यातील निवडीसाठी उपलब्ध असल्याचं क्रिकेट बोर्डाला कळवलं होतं. त्यानंतर यशस्वीची निवड करण्यात आलीय.

यशस्वी जैस्वालचा समावेश

यशस्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या मोसमातील शेवटच्या सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे एमसीए यशस्वीवर नाराज असल्याची चर्चा पाहायला मिळाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशस्वी मर्जीनुसार सामने खेळतोय. मात्र यशस्वी फिट नसल्याने खेळत नसल्याचंही म्हटलं गेलं होतं. मात्र हा सर्व इतिहास झाला. आता यशस्वी कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यशस्वीने रणजी ट्रॉफीत यंदाच्या मोसमात एकमेव सामना खेळलाय. यशस्वीने या एकमेव सामन्यात धमाका केलाय. यशस्वीने या एकाच सामन्यात 223 धावा कुटल्यात. यशस्वीने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं होतं.

मुंबईसमोर कुणाचं आव्हान?

दरम्यान मुंबईसमोर उपांत्य पूर्व फेरीत 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान कर्नाटक टीमचं आव्हान असणार आहे. हा सामना वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीएच्या मैदानात होणार आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यासाठी मुंबई टीम : शार्दुल ठाकुर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड, सर्फराज खान, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, साईराज पाटील, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, ओमकार तरमाळे, दिव्यांश सक्सेना आणि सूर्यांश शेंडगे.