
आयपीएलच्या 18 व्या मोसमात प्लेऑफसाठी 4 संघ निश्चित झाल्यानंतर आता टॉप 2 साठी जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे. टॉप 2 मध्ये असणाऱ्या टीमला फायनलमध्ये पोहचण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहण्यासाठी प्लेऑफमधील संघ प्रयत्नशील असतात. या हंगामात आज पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. टॉप 2 च्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. विजयी संघ क्वालिफायर 1 साठी पात्र ठरेल. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष लागून आहे. या सामन्यात मुंबईसमोर मुंबईच्याच खेळाडूचं तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे या खेळाडूला रोखण्याचं आव्हान पलटणसमोर असणार आहे.
हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यर पंजाबचं कर्णधारपद सांभाळणार आहे. श्रेयस देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. तसेच त्याला नेतृत्वाचाही अनुभव आहे. तसेच श्रेयस या हंगामात कर्णधार आणि फलंदाज म्हणून यशस्वी ठरला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी श्रेयस अय्यर सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
श्रेयसने या 18 व्या हंगामात आतापर्यंत 13 सामन्यांमधील 13 डावांत 172.44 या स्ट्राईक रेटने आणि 48.80 अशा सरासरीने एकूण 283 बॉलमध्ये 488 रन्स केल्या आहेत. श्रेयसने या दरम्यान 5 अर्धशतकं झळकावली. तसेच श्रेयसने 37 चौकार आणि 29 षटकार लगावले आहेत.
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 32 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबई या 32 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये पंजाबवर वरचढ राहिली आहे. मुंबईने पंजाबवर 17 सामन्यांमध्ये मात केली आहे. तर पंजाबने मुंबईला 15 वेळा पराभूत केलं आहे.
कोण पोहचणार क्वालिफायर 1 मध्ये?
2️⃣ spots. 4️⃣ contenders 😬
Who’ll break through and lock in their place in the Qualifier 1? 🤔#TATAIPL pic.twitter.com/h7EEUxzXyJ
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
दरम्यान पॉइंट्स टेबलमध्ये पंजाब किंग्स दुसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानी विराजमान आहे. पंजाबने 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर पंजाबचा 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 17 गुण आहेत. पंजाबचा नेट रनरेट हा +0.327 असा आहे. तर दुसऱ्या बाजूला पलटण चौथ्या क्रमांकावर आहे. पलटणने 13 पैकी 8 सामने जिंकलेत. पलटणकडे 16 पॉइंट्स आहेत. तर पलटणचा नेट रनरेट हा +1.292 असा आहे.