Ipl 2025 Final : ट्रॉफी आरसीबीने जिंकली, मात्र सूर्याने पटकावला ‘हा’ पुरस्कार
Suryakumar Yadav Mumbai Indians : सूर्यकुमार यादव याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात सर्वोत्तम कामगिरी करत मुंबई इंडियन्सला क्वालिफायर-2 पर्यंत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. सूर्याने या कामगिरीच्या जोरावर स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पुरस्कार पटकावला.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इतिहास घडवला. आरसीबीने 18 व्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली. आरसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकणारी आठवी टीम ठरली. तर दुसर्या बाजूला पंजाब किंग्सला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. मुंबई इंडियन्स या हंगामात अंतिम फेरीत पोहचण्यात अपयशी ठरली. मात्र मुंबईच्या सूर्यकुमार यादव याने जे केलं ते आयपीएल विजेत्या संघातील एकालाही जमलं नाही. सूर्याने केलेल्या कामगिरीसाठी त्याचा मानाच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सूर्या मुंबईसाठी अशी कामगिरी करणारा एकूण दुसरा तर दिग्गज सचिन तेंडुलकर याच्यानंतर पहिला फलंदाज ठरला. सूर्याने नक्की काय केलं? जाणून घेऊयात.
सूर्याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट (MVP) पुरस्कार पटकावला. सूर्याने 18 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. सूर्याने या हंगामात खेळलेल्या प्रत्येक सामन्यात 25 पेक्षा अधिक धावा केल्या. सूर्या मुंबईकडून 18 व्या पर्वात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर सूर्या या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी राहिला.
सूर्यकुमारच्या 717 धावा
सूर्यकुमारने 18 व्या मोसमातील 16 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांच्या मदतीने 717 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सचा ओपनर साई सुदर्शन याने सर्वाधिक 759 रन्स केल्या. मात्र त्यानंतरही सूर्यकुमार ‘मोस्ट वॅल्यूएबल प्लेअर’ हा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला. सन्मानचिन्ह आणि 10 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. सूर्यकुमार 2012 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. मात्र अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सूर्याला यंदा हा पुरस्कार मिळवण्यात यश आलं.
एकच वादा, सूर्या दादा
𝗠𝗩𝗣 = 𝐒𝐊𝐘 👏
The highly consistent Surya Kumar Yadav wins the Most Valuable Player Award 💙#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @surya_14kumar pic.twitter.com/ZOgcBD0Xwb
— IndianPremierLeague (@IPL) June 3, 2025
शेन वॉटसन पहिला खेळाडू
आयपीएल स्पर्धेत याआधी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार दिला जायचा. मात्र 2013 साली या पुरस्काराचं नाव बदलून ‘मोस्ट वॅल्युएबल प्लेअर अवॉर्ड’ असं ठेवण्यात आलं. स्पर्धेच्या सुरुवातीपासून हा पुरस्कार देण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन हा पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू होता.
सुनील नारायणचा कारनामा
दरम्यान ऑलराउंडर सुनील नारायण याने हा पुरस्कार तब्बल 3 वेळा जिंकण्याचा कारनामा केला आहे. सुनीलने 2012, 2018 आणि 2024 साली ही कामगिरी केली होती. ख्रिस गेल याने 2011 साली या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं. विराट कोहली याने 2016 हा पुरस्कार मिळवला होता. तर शुबमन गिल याने 2023 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता.
