पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! सट्टेबाजी प्रकरणात मोहम्मद रिझवान अडकला? नेमकं काय झालं?
पाकिस्तान क्रिकेट आणि गैरव्यवहार हे काय आता नवीन राहिलेलं नाही. पाकिस्तानचे अनेक खेळाडू यापूर्वी सट्टेबाजी प्रकरणात अडकले आहेत. आता त्यात एका नाव भर पडण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीप्रकरणी मोहम्मद रिझवानचं नाव समोर आलं आहे.

पाकिस्तान क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग आणि वादांचे ग्रहण संपण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातून रोज काही ना काही बातमी समोर येत आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाने आपली विश्वासर्हता गमावल्याचं दिसत आहे. आता संघाचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आणि माजी कर्णधार मोहम्मद रिझवान हा एका मोठ्या प्रकरणात गुंतला असल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी मालिकेतून मधूनच संघातून वगळण्यात आलेल्या रिझवानवर क्रिकेटमधील सट्टेबाजीत सहभाग असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या एका तपास यंत्रणेने चौकशी सुरू केली आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर रिझवानविरुद्ध या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. पाकिस्तानी संघ हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर सुरक्षा आणि तपास यंत्रणांनी खेळाडूंचे मोबाईल फोन जप्त केले आणि त्यातील डेटा गोळा केला. रिझवानच्या वकिलाने नुकतीच न्यायालयाला माहिती दिली की, तेव्हापासून तपास यंत्रणेने त्याचा फोन अद्याप परत केलेला नाही.
NCCIA ची नोटीस आणि हायकोर्टाचा झटका
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेने अलीकडेच मोहम्मद रिझवानला सट्टेबाजी आणि जुगारात सामील असल्याच्या गंभीर आरोपाखाली नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये रिझवानला संस्थेसमोर हजर राहून आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले होते. रिझवानने ही नोटीस रद्द करण्यासाठी लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, गुरुवार, 17 सप्टेंबर 2026 रोजी उच्च न्यायालयाने त्याचे अपील फेटाळून लावले आणि त्याला तपास संस्थेसमोर हजर राहण्याचा कडक आदेश दिला. त्यामुळे आता त्याच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही.
कारकीर्द धोक्यात येण्याची शक्यता
उच्च न्यायालयाच्या या कायदेशीर धक्क्यामुळे रिझवानच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे, कारण आता त्याला तपास यंत्रणेच्या तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. हा तपास पाकिस्तान क्रिकेट आणि रिझवान या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यावरच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची पुढील दिशा ठरणार आहे. रिझवानला आधीच पाकिस्तानी संघातून हळूहळू बाहेर काढले जात आहे, अशा परिस्थितीत जर त्याच्यावरील हे आरोप खरे ठरले, तर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा कायमचा अंत होऊ शकतो.
