T20 World Cup स्पर्धेत सामना न खेळताच पाकिस्तान बाहेर? बहिष्कारानंतर सलमान आगा टेन्शनमध्ये

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तानच्या नाटकाचा एक अंक संपला आहे. त्यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याऐवजी भारताविरूद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण नाटकाच्या दुसऱ्या अंकात ट्वीस्ट आला आहे. त्यामुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकतं.

T20 World Cup स्पर्धेत सामना न खेळताच पाकिस्तान बाहेर? बहिष्कारानंतर सलमान आगा टेन्शनमध्ये
T20 World Cup स्पर्धेत सामना न खेळताच पाकिस्तान बाहेर? बहिष्कारानंतर सलमान आगा टेन्शनमध्ये
Image Credit source: ICC Twitter
| Updated on: Feb 06, 2026 | 6:34 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान अँड नाटक कंपनीकडून रोज नवी स्क्रिप्ट लिहिली जात आहे. सुरूवातीला बांगलादेशला पाठिंबा दिला आणि आक्रमक बाणा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बांगलादेशचा संघ बाद झाल्यानंतर स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ चर्चेत राहिला. स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना भारताविरुद्ध सामना खेळणार नाही असं सांगितलं. त्यामुळे पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा चर्चेत आला. काहीही नाटकं करायची आणि चर्चेत राहायचं असा पवित्रा पाकिस्तान क्रिकेट संघ आणि बोर्डाचा दिसत आहे. पण असं होत असताना आपल्याच पायात अडकून तोंडावर पडण्याची वेळ आहे. सामना न खेळता स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. ही कारवाई काही आयसीसी नाही तर निसर्ग करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ टेन्शनमध्ये आला आहे. मागच्या पर्वातही पाकिस्तानचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता.

भारत आणि श्रीलंकेकडे टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. त्यामुळे श्रीलंकेत सामने होणार असल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. कारण श्रीलंकेत लहरी वातावरण आहे. पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध 7 फेब्रुवारीला श्रीलंकेच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना शनिवारी सकाळी 11 वाजता सुरू होईल. पण सामना सुरू झाल्यानंतर एका तासाने पावसाचा अंदाज आहे. कोलंबोत पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या वाटेला प्रत्येकी एक गुण येईल.

10 फेब्रुवारीला पाकिस्तानचा संघ अमेरिकेशी सामना करणार आहे. मागच्या पर्वात अमेरिकेने पाकिस्तानला दणका दिला होता. त्यामुळे अमेरिकेला कमकुवत समजणं महागात पडू शकते. असं असताना या सामन्यातही पावसाची शक्यता आहे. या सामन्यातही पाऊस झाला आणि सामना रद्द झाला तर पाकिस्तानला फक्त 1 गुण मिळेल. त्यात 15 फेब्रुवारीला भारत पाकिस्तान लढत होणार आहे. या सामन्यात खेळणार नाही असा पाकिस्तानचा पवित्रा आहे. त्यामुळे आधीच हातून 2 गुण गेले आहेत. आता फक्त नामिबियाचं आव्हान असेल. हा सामना व्यवस्थित झाला आणि जिंकला तर 2 गुण मिळतील. त्यामुळे पाकिस्तानचे फार फार तर 4 गुण होतील.

अमेरिका, नेदरलँड आणि नामिबिया या संघांना पाकिस्तानपेक्षा चांगले गुण मिळण्याची संधी आहे. या तिन्ही संघांचे पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेत सामने होतील. तर उर्वरित सर्व सामने भारतात होणार आहेत. भारताविरूद्धचा सामना सोडला तर हे संघ एकमेकांविरुद्ध लढतीसाठी उभे राहतील. त्यामुळे फार कठीण आव्हान नसेल. या तीन पैकी एका संघाने पाकिस्तानपेक्षा चांगले गुण मिळवले तर पाकिस्तानचा स्पर्धेतून पत्ता कापला जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us