U19 WC 2026: पाकिस्तानचा स्पर्धेतील पहिला विजय, पुढचा सामना करो या मरोची लढाई
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. आता पाकिस्तानला काहीही करून शेवटचा सामन्यात विजय मिळवावा लागेल. अन्यथा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तान आणि स्कॉटलँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलँडने 48.1 षटकांचा सामना केला आणि सर्व गडी गमवून 187 धावा केल्या. तसेच विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानने हे आव्हान 43.1 षटकात पूर्ण केलं. तसेच या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे पाकिस्तानच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. स्कॉटलँडकडून एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. थॉमस नाइटने 37, ओली जोन्सने 30, फिनले रामसेने 33 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून अली रझाने 10 षटकात 37 धावा देत 4 गडी बाद केले. मोमिन कमरने 3 विकेट काढल्या. तर मोहम्मद सय्यम आणि अब्दुल सुभनने प्रत्येकी एक विकेट काढली.
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विजयी धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात काही चांगली झाली नाही. 48 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. अली हसन बलोचने 15, तर समीर मिन्हास 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर उस्मान खान आणि अहमद हुसैन यांनी डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी 111 धावांची भागीदारी केली. उस्मान खानने 75 आणि अहमद हुसैनने 47 धावांची खेळी केली. तर कर्णधार फरहान युसफने 18 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफ म्हणाला की, ‘मला सर्वात जास्त आनंद झाला तो म्हणजे प्रत्येक खेळाडूने 100 टक्के दिले. आम्ही शेवटचा सामना गमावला. पण व्यवस्थापनाने मुलांना पाठिंबा दिला आणि हे या कामगिरीत दिसून आले. आमची गोलंदाजी एक मोठी ताकद आहे. आमच्याकडे अली रझासारखा खरा वेगवान गोलंदाज आहे, ज्याने दोन्ही सामन्यांमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली, तसेच दर्जेदार फिरकी गोलंदाजही आहेत आणि एक कर्णधार म्हणून मला अशा गोलंदाजी हल्ल्याचे व्यवस्थापन करायला खूप आवडते. मधल्या फळीची कामगिरी देखील खूप आनंददायी होती, विशेषतः अहमद आणि उस्मान यांच्यातील शतकी भागीदारी, जे आमच्या संघाचा कणा आहेत. यापूर्वी टॉप-ऑर्डर कोसळल्यानंतर, या सामन्यात आम्ही ज्या पद्धतीने सावरलो ते आगामी सामन्यांसाठी खूप चांगले संकेत आहे.’
पाकिस्तानला पहिल्या सामन्यात इंग्लंडने 37 धावांनी पराभूत केलं होतं. इंग्लंडने विजयासाठी फक्त 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण पाकिस्तानचा डाव अवघ्या 173 धावांवर आटोपला. पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने पुढच्या फेरीचं गणित कठीण झालं. या गटातून इंग्लंडने सलग दोन विजय मिळवून पुढच्या फेरीत स्थान पक्कं केलं आहे. स्कॉटलँड आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना ड्रॉ झाल्याने प्रत्येकी 1 गुण मिळाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी पुढचा सामना करो या मरोची लढाई आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. विजय संघ पुढच्या फेरीत स्थान पक्कं करेल. तर स्कॉटलँडचा सामना इंग्लंडशी आहे. पण या सामन्यात इंग्लंडचं पारडं जड दिसत आहे.
