Shahid Afridi : बांगलादेशची हकालपट्टी आफ्रिदीला जिव्हारी, माजी क्रिकेटर पुन्हा बरळला, काय म्हणाला?

Shahid Afridi On Icc : पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याने आतापर्यंत अनेकदा विनाकारण भारतविरोधात गरळ ओकल्याचा इतिहास आहे. आफ्रिदीने आता आयसीसीवर निशाणा साधला आहे. जाणून घ्या आफ्रिदी काय म्हणाला.

Shahid Afridi : बांगलादेशची हकालपट्टी आफ्रिदीला जिव्हारी, माजी क्रिकेटर पुन्हा बरळला, काय म्हणाला?
Pakistan Former Cricketer Shahid Afridi
Image Credit source: Instagram/Shahid Afridi
| Updated on: Jan 25, 2026 | 5:08 PM

पाकिस्तानकडून आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत भारतात न खेळण्याच्या बांगलादेशच्या भूमिकेचं समर्थन करण्यात आलं. आतापर्यंत या प्रकारणात राशिद लतीप आणि पीसीबीचे माजी अधिकारी नजम सेठी यांनी आयसीसी-बीसीसीआयवर टीका केली आहे. आता यात कायम गरळ ओकणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार-ऑलराउंडर शाहिद अफ्रिदी याची भर पडली आहे. पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेटकरी आफ्रिदीवर तुटून पडले आहेत. आफ्रिदी नक्की काय म्हणालाय? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. आफ्रिदीने बांगलादेशला वर्ल्ड कप स्पर्धेतून वगळण्यावरुन आयसीसीच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आफ्रिदी काय म्हणाला?

आयसीसीने बांगलादेशवर केलेल्या कारवाईवरुन आफ्रिदी बरळला आहे. आयसीसीने निष्पक्ष निर्णय घेतला नसल्याचं आफ्रिदीने सोशल मीडिया पोस्टमधून म्हटलं आहे. आफ्रिदीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं उदाहरण दिलं. भारताने सुरक्षेच्या कारणामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे होता. आफ्रिदीने या पोस्टमधून आयसीसीवर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. आयसीसीने भारतासारखीच  बांगलादेशला समान वागणूक न दिल्याचं आफ्रिदीचं म्हणणं आहे.

“बांगलादेश आणि आयसीसी स्पर्धेत खेळलेला एक माजी खेळाडू या नात्याने मला आयसीसीच्या या निर्णयामुळे निराशा झाली आहे. आयसीसीने 2025 मध्ये सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये न खेळण्याचा भारताचा निर्णय स्वीकाराला होता. मात्र आयसीसी बांगलादेशबाबत सारख्याच प्रकरणात तसाच निर्णय घेत नाहीय”,असं आफ्रिदीने म्हटलं. मात्र आफ्रिदीला ही पोस्ट करताना आयसीसीने बीसीबीला त्यांचे खेळाडू, पत्रकार आणि चाहत्यांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या आश्वासनाचा जाणीवपूर्वक विसर पडल्याचं यातून दिसून येत आहे.

“आयसीसीचा पाया हा निष्पक्षता आणि निरंतरतेवर आधारित आहे. तसेच बांगलादेशी क्रिकेटपटू आणि त्यांचे चाहते हे देखील समान वागणुकीसाठी पात्र आहेत”, असं म्हणत आफ्रिदीने आयसीसीवर टीका केली आहे.

बांगलादेशच्या जागी स्कॉटलँडचा समावेश

दरम्यान आयसीसीने बांगलादेशला या स्पर्धेतून वगळलं असल्याचं शनिवारी 24 जानेवारीला जाहीर केलं. तसेच बांगलादेशच्या जागी या स्पर्धेत स्कॉटलँड टीमचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन हे भारत आणि श्रीलंकेत करण्यात आलं आहे. केकेआरने मुस्तफिजूर रहमान याची आयपीएल स्पर्धेतून हकालपट्टी केली. त्यांनतर बीसीबीने अचानक सुरक्षेचं कारण पुढे करत वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने हे भारताऐवजी श्रीलंकेत आयोजित करण्यात यावेत, अशी विनंती आयसीसीकडे केली होती. मात्र आयसीसीने तुम्हाला इथेच खेळावं लागेल, असं स्पष्ट केलं. मात्र बीसीबी न जुमानल्याने आयसीसीने बांगलादेशचा वर्ल्ड कप स्पर्धेतून पत्ता कट केला.