PCB : वार्षिक कराराची घोषणा, 50 टक्क्यांनी घसघशीत वाढ, खेळाडूंची चांदी, क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
Pakistan Cricket Board Annual Contract 2025-2026 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या वार्षिक करारात एकूण 20 खेळाडूंचा समावेश आहे. जाणून घ्या.

क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. पीसीबीने महिला पाकिस्तान संघाच्या (Women Cricket) वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 पर्यंत लागू असणार आहे. पीसीबीने या वार्षिक करारात एकूण 20 खेळाडूंना संधी दिली आहे. या 20 खेळाडूंना 5 श्रेणींमध्ये विभागण्यात आलं आहे. तसेच पीसीबीने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या श्रेणीची घोषणा केली आहे. तसेच सर्व श्रेणीतील खेळाडूंना मिळणाऱ्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.
पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार ए, बी, सी आणि डी अशा 4 कॅटेगरीत खेळाडूंना विभागण्यात आलं आहे. तसेच युवा खेळाडूंच ई या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. सर्वच श्रेणीतील खेळाडूंना आधीपेक्षा जास्तीची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
पाकिस्तानकडून नव्या वार्षिक कराराची घोषणा
पाकिस्तानची स्पिनर सादिया इक्बाल ही आयसीसी टी 20i रँकिमध्ये अव्वल स्थानी आहे. सादियासह, फातिमा सना, मुनीबा अली आणि सिदरा अमीन यांचा ए कॅटेगरीत समावेश करण्यात आला आहे.
बी कॅटेगरीत कोण?
आलिया रियाज, डायन बेग आणिन नशरा संधु या तिघींना ब श्रेणीत संधी देण्यात आली आहे. तर रमीन शमीमला डीमधून क श्रेणीत प्रमोशन मिळालं आहे.
ड श्रेणीत सर्वाधिक 10 खेळाडू आहेत. यामध्ये गुल फिरोजा, नजीहा अलवी, नतालिया परवेज, ओमैमा सोहेल, सदफ शमास, सिदरा नवाझ, सैयदा अरूब शाह, तूबा हसन, उम्म-ए-हानी आणि वहीदा अखतर यांचा समावेश करण्यात आला आहे.
युवा खेळाडूंसाठी मोठा निर्णय
पीसीबीने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार पीसीबीने उदयोन्मुख (Emerging) खेळाडूंसाठी ई या नव्या श्रेणीची घोषणा केली आहे. या श्रेणीत ईमान फातिमा (अनकॅप्ड) आणि शव्वाल झुल्फिकार या दोघींचा समावेश करण्यात आला आहे.
त्या निर्णयामुळे खेळाडूंची चांदी
दरम्यान पीसीबीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या खेळाडूंच्या मासिक वेतनात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी क्रिकेट बोर्डाने हे पाऊल उचललं आहे. ही 50 टक्के वाढ सर्व श्रेणीतील खेळाडूंसाठी आहे.
