
IPL 2026, Punjab Kings: आयपीएल स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. तसेच अंतिम सामना 31 मार्चला होणार आहे. जेतेपदाच्या शर्यतीत एकूण 10 संघ आहेत आणि दोन महिन्यानंतर जेतेपदाचा मानकरी कळणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार? हे आता सांगणं कठीण आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी जेतेपदाचा मानकरी कोण असणार? याबाबत भाकीत वर्तवण्यात आलं आहे. या स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंहने भाकीत वर्तवलं आहे. यंदा जेतेपद पंजाब किंग्स मिळवणार असं त्याने ठामपणे सांगितलं आहे. मागच्या पर्वात फक्त 6 धावांनी जेतेपद हुकलं होतं. पण यावेळी पंजाब किंग्स जेतेपदाची चव चाखेल असं शशांक सिंहने सांगितलं आहे.
आयपीएल 2026 स्पर्धेबाबत जियोस्टार प्रेस रूमध्ये बोलताना शशांक सिंह म्हणाला की, ‘मला माहिती आहे की 31 मे रोजी आम्ही चिन्नास्वामी स्टेडियमध्ये जेतेपदाची ट्रॉफी उचलू. ही एक फक्त भावना नाही तर मला पूर्ण खात्री आहे की हे नक्की घडेल.’ मागच्या पर्वात जेतेपदाची संधी हुकली होती. त्यामुळे यंदा काय तयारी केली आहे? असा प्रश्न विचारताच शशांक म्हणाला की, ‘आम्ही प्रत्येक सामना स्वतंत्रपणे खेळू, कारण ट्रॉफी जिंकणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे. जर आम्ही गेल्या वर्षी अंतिम फेरीत पोहोचण्याचाच विचार करत राहिलो, तर आमच्यावर खूप दबाव येईल. सध्या आमचे ध्येय गुजरात टायटन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यावर आहे. त्यानंतर सीएसके आणि केकेआर विरुद्धच्या सामन्यांची तयारी करणार आहोत.’
पंजाब किंग्सने दहा वर्षानंतर आयपीएल 2025 स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. साखळी फेरीत 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून अव्वल स्थान पटकावलं होतं. पण क्वॉलिफायर 1 मध्ये आरसीबीकडून पराभव झाला. त्यानंतर क्वॉलिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली. पण जेतेपदाचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पुन्हा एकदा पंजाब किंग्स संघ सज्ज झाला आहे. आता या स्पर्धेत खेळाडूंचा फॉर्म कसा हे देखील महत्त्वाचं आहे. खेळाडू फॉर्मात असले तर संघाला अडचणीतून काढण्यात मदत होते. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणं कितपत शक्य होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.