ENG vs IND : हेड कोच गंभीरची थट्टा करणं महागात;बेन स्टोक्सची मस्ती जिरली!
England vs India 5th Test : इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर आर अश्विन याने बेन स्टोक्सने चौथ्या कसोटी सामन्यानंतर काय म्हटलं होतं याची क्रिकेट चाहत्यांना आठवण करुन दिली.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया कसोटी मालिकेतील चौथा सामना हा मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात खेळवण्यात आला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने केलेल्या शतकी खेळीमुळे भारताने हा सामना अनिर्णित राखला. या सामन्यात भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत याच्या पायाला दुखापत झाली. पंतने त्यानंतरही दुखापत बाजूला सारत बॅटिंग केली. या सामन्यानंतर भारताचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी सब्स्टीट्यूट खेळाडूबाबत प्रतिक्रिया दिली होती. गंभीरच्या या प्रतिक्रियेची इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने थट्टा उडवली होती. भारताचा माजी ऑलराउंडर आर अश्विन याने उभयसंघातील पाचव्या सामन्यानंतर स्टोक्सने केलेल्या विधानाला अधोरेखित करत आपली भूमिका मांडली.
आर अश्विन काय म्हणाला?
“तुम्ही जे करता तेच परत मिळतं. चौथ्या कसोटीत ऋषभ पंतच्या दुखापतीनंतर गौतम गंभीरला सब्स्टीट्यूटबाबत प्रश्न करण्यात आला. यावर गंभीरने नियम असायला हवा असं म्हटलं होतं. जर एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याच्या जागी सब्स्टीट्यूट खेळाडूला संधी मिळायला हवी. त्यानंतर हाच प्रश्न बेन स्टोक्सला विचारण्यात आला. स्टोक्सने या विषयाला मजाक म्हटलं होतं”, असं अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं.
इंग्लंडचा ऑलराउंडर ख्रिस वोक्स याला पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. अश्विनने या पार्श्वभूमीवर संबंधित विषयाला हात घातला आणि स्टोक्सने केलेल्या विधानाची क्रिकेट चाहत्यांना आठवण करुन दिली.
करुन नायर याने मारलेला फटका रोखण्याच्या प्रयत्नात ख्रिस वोक्स याला दुखापत झाली होती. वोक्सने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी डाईव्ह मारली. वोक्स या प्रयत्नात बाउंड्री लाईनच्या बाहेर खांद्यावर पडला. त्यामुळे वोक्सच्या खांद्याला दुखापत झाली. परिणामी वोक्सला उर्वरित सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे वोक्सला दोन्ही डावात बॉलिंग करता आली नाही. मात्र वोक्स दुसऱ्या डावात इंग्लंड पराभवाच्या उंबरठ्यावर असताना फ्रॅक्चर हातासह बॅटिंग करण्यासाठी मैदानात आला होता. वोक्सच्या या लढाऊ वृत्तीचं चाहत्यांकडून कौतुक करण्यात आलं होतं .
मालिका 2-2 ने बरोबरीत
दरम्यान उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. पाचव्या सामन्यात भारताला 9 विकेट्स घेऊन विजयी करणाऱ्या मोहम्मद सिराज याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच सिराजने या मालिकेत सर्वाधिक 23 विकेट्स मिळवल्या. तसेच या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या शुबमन गिल याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
