आयपीएल 2026 स्पर्धेसाठी RAPP यादी जाहीर, 1307 खेळाडूंना मिळाली जागा; जाणून घ्या सर्वकाही
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझींनी संघाची बांधणी केली आहे. आता या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. केकेआर संघातून मुस्ताफिझुर रहमानला काढल्याने त्यांना बदली खेळाडू घेता येणार आहे. असं असताना रॅप यादी जाहीर करण्यात आली आहे. काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावासाठी एकूण 1390 खेळाडूंनी नाव नोंदवलं होतं. त्यापैकी 359 खेळाडूंना आयपीएल लिलावात बोलीसाठी स्थान मिळालं. त्यापैकी फक्त 77 खेळाडूंना खरेदी केलं गेलं. म्हणजेच या स्पर्धेसाठी नाव नोंदवलेल्या 1313 खेळाडू वंचित राहिले. आता बीसीसीआयने या खेळाडूंसाठी पुन्हा एक व्यासपीठ मोकळं करून दिलं आहे. बांगलादेशी खेळाडू वगळून 1307 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या खेळाडूंना आरएपीपी यादीत स्थान मिळालं आहे. आरएपीपी म्हणजे रजिस्टर अवेलेबल प्लेयर पूल. ही यादी बदली खेळाडूंच्या निवडीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.जर कोणत्याही खेळाडूला आयपीएलमधून वगळण्यात आले तर त्यांना आरएपीपी यादीतून निवडावे लागेल. तसेच, लिलावासाठी नोंदणीकृत मूळ किमतीपेक्षा कमी किंमत देता येणार नाही असा नियम लागू करण्यात आला आहे.
RAPP यादीचे नियम काय आहेत?
- फ्रँचायझी या विशिष्ट यादीतून बदली खेळाडूंची निवड करू शकते.उदाहरणार्थ, जखमी संघातील सदस्यांच्या जागी या यादीतील खेळाडूंपैकी एकाची निवड करावी लागेल. या यादीबाहेरच्या खेळाडूला घेता येणार नाही.
- एखाद्या खेळाडूला त्याच्या मूळ लिलावाच्या राखीव किमतीपेक्षा कमी किमतीत करारबद्ध करता येणार नाही. उदाहरणार्थ, मिनी लिलावात एखाद्या खेळाडूची किंमत 2 कोटी रुपये असेल. तर त्याला दोन कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागेल. पण कमी किमतीत त्याला घेता येणार नाही.
- आरएपीपी यादीतील खेळाडूंना नेट बॉलर म्हणून घेता येईल. देशांतर्गत क्रिकेटपटूंची यासाठी निवड केली जाते. पण इतर कोणत्याही फ्रँचायझीने त्या खेळाडूची बदली म्हणून निवड केली. तर नेट बॉलर म्हणून निवडलेल्या फ्रेंचायझीला त्याला ताबडतोब सोडले लागेल.
RAPP यादीत समाविष्ट असलेले प्रमुख खेळाडू:
2 कोटी रुपये बेस प्राईस: स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया), डॅरिल मिशेल (न्यूझीलंड), डेव्हॉन कॉनवे (न्यूझीलंड), जेक फ्रेझर-मॅकगर्क (ऑस्ट्रेलिया), रीस टॉपली (इंग्लंड) आणि जेमी स्मिथ (इंग्लंड).
1.5 कोटी रुपये बेस प्राईस: रहमानउल्लाह गुरबाज (अफगाणिस्तान), स्पेन्सर जॉन्सन (ऑस्ट्रेलिया) आणि टिम सेफर्ट (न्यूझीलंड).
1 कोटी रुपये मूळ किंमत: जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), फजलहक फारुकी (अफगाणिस्तान).
RAPP यादीतील भारतीय खेळाडू: उमेश यादव, नवदीप सैनी, चेतन साकारिया, संदीप वारियर, मयंक अग्रवाल, दीपक हुडा, के.एस. भरत, यश धुळ, अभिनव मनोहर, अथर्व तिडे, मनन वोहरा, महिपाल लोमरोर, कमलेश नागरकोटी आणि राजवर्धन हंगरगेकर.
