फिरकीपटू रवींद्र जडेजाची राजकारणात एन्ट्री! या पक्षाशी साधली जवळीक
फिरकीपटू रवींद्र जडेजा याने राजकारणात एन्ट्री घेतल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्याने राजकीय पक्षात एन्ट्री घेतल्याचं सांगितलं जात आहे. रवींद्र जडेजाची पत्नी भाजपात असल्याने त्याला आधीच राजकीय वलय लाभलं आहे. त्यामुळे रवींद्र जडेजाने खरंच राजकारणात एन्ट्री घेतली असेल तर त्याला या खेळपट्टीवर मेहनत घ्यावी लागेल.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि टी20 वर्ल्डकप विजेत्या संघातील सदस्य रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री घेतल्याची चर्चा रंगली आहे. रवींद्र जडेजा भाजपात सहभागी झाल्याचे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या एक्स खात्यावरून ही पोस्ट व्हायरल होत आहे. यात दोघांनी भाजपाचं सदस्यत्व घेतल्याचं दिसत आहे. पण रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाचं हे अधिकृत खातं आहे की नाही याबाबत शंका आहे. पण रिवाबा आधीच भारतीय जनता पक्षाची आमदार असल्याने या बातमीला काही अंशी दुजोरा मिळत आहे. रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगर नॉर्थ विभागातून आमदार आहे. त्यामुळे या पोस्ट महत्त्व प्राप्त झालं आहे. रवींद्र जडेजा यापूर्वी पत्नी रिवाबा हीच्या प्रचारासाठी मैदानात उतरला होता. काही रोड शोमध्येही त्याने भाग घेतला होता. त्यामुळे जडेजाभोवती राजकारणाचं वलय आधीपासूनच आहे. भाजपाचं सदस्यत्व घेतल्यानंतर त्याची पक्षात काय भूमिका असेल हे मात्र त्या पोस्टवरून स्पष्ट होत नाही.
2019 मध्ये रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाने भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला होता. भाजपाने तिला 2022 मध्ये जामनगर विधानसभेची जागा दिली होती. तिथे तिने करशनाई करमुर यांना पराभूत केलं होतं. त्यामुळे रवींद्र जडेजा इतर खेळाडूंप्रमाणे राजकारणात नशिब आजमावणार का? याची चर्चा रंगली आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका 2022 सालीच पार पडल्या आहेत. आता या निवडणुका उलटून दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे आसपास राजकारणाशी निगडीत तरी काही चित्र दिसत नाही. पण सदस्यत्व घेतल्याने चर्चा रंगली आहे.
🪷 #SadasyataAbhiyaan2024 pic.twitter.com/he0QhsimNK
— Rivaba Ravindrasinh Jadeja (@Rivaba4BJP) September 2, 2024
टी20 वर्ल्डकप विजयानंतर रवींद्र जडेजाने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तसेच वनडे आणि कसोटी संघात खेळणार असल्याचं सांगितलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची निवड झाली नव्हती. दुसरीकडे, देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत रवींद्र जडेजाला संधी मिळाली होती. पण काही कारणास्तव माघार घेतली. या माघारीचं कारण अस्पष्ट आहे. दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळेल की नाही याबाबत शंका आहे. रवींद्र जडेजाने 72 कसोटी सामन्यात 294 विकेट आणि 3036 धावा केल्या आहेत.