ऋषभ पंतने लखनौ सुपर जायंट्सची धुरा घेताच पंजाब किंग्स उडवली खिल्ली! टेन्शन आलं होतं की…
दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केल्यानंतर ऋषभ पंत आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतसाठी 27 कोटी रुपयांची बोली लावली आणि संघात घेतलं. आता ऋषभ पंतच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. यावेळी लिलावादरम्यान एक टेन्शन होतं असं ऋषभ पंत म्हणाला. पंजाब किंग्स फ्रेंचायझीबाबत काय म्हणाला? ते जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेत काही संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. या सामन्यावेळी चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह असतो. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स किंवा कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यांची कायम चर्चा होत असते. दोन्ही बाजूचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांवर तुटून पडतात. आपल्या संघासाठी सोशल मीडियावर बॅटिंग करताना दिसतात. या आयपीएल 2025 स्पर्धेपासून आणखी दोन संघात ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात विजयासाठी तीव्र झुंज असेल. कारण लखनौ सुपर जायंट्सच्या वक्तव्यानंतर ही स्पर्धा सुरु झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत दोन्ही बाजूचे चाहते एकमेकांना डिवचण्याची संधी सोडणार नाही. त्याला कारण ठरणार आहे ते ऋषभ पंतचं वक्तव्य…
आयपीएल मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटींची सर्वात मोठी बोली लावून ऋषभ पंतला आपल्या ताफ्यात घेतलं. आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली आहे. श्रेयस अय्यरचा 26.75 कोटींचा विक्रम त्याने अवघ्या काही मिनिटात मोडून काढला होता. पंजाबने श्रेयस अय्यरसाठी इतकी मोठी बोली लावली होती. अय्यरसाठी इतकी मोठी बोली लावल्यानंतर पंतला घेण्याची संधी पंजाबकडे होती. पण तसं झालं नाही.
लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात कर्णधार म्हणून ऋषभ पंतच्या नावाची घोषणा केली. ऋषभ पंतने या कार्यक्रमात पंजाब किंग्स खिल्ली उडवत सांगितलं की, ‘मला फक्त एकच टेन्शन आलं होतं आणि ते म्हणजे पंजाबचं.. त्यांच्या पर्समध्ये 112 कोटी रुपये होते. जेव्हा पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला खरेदी केलं तेव्हा मला वाटलं की आता लखनौसोबत जाऊ शकतो. पण लिलावात काही होऊ शकतं. म्हणून मी काही काळ वाट पाहिली आणि प्रार्थना करत होतो.’
Honesty at his best 😭😭😭 Pant lol pic.twitter.com/BSyOagZsGf
— Vijay`17 (@Onehandedsix) January 20, 2025
ऋषभ पंतसाठी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चढाओढ होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने रिलीज करून या लिलावात उडी घेतली. हा लिलाव बघता बघात 20 कोटींच्या घरात पोहोचला होता. पण लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझीने पक्का निर्णय केला होता. दिल्ली कॅपिटल्सने राईट टू मॅच कार्ड वापरलं आणि लखोनौची धाकधूक वाढली. पण लखनौ 27 कोटींची बोली लावली आणि सर्व शक्यतांवर पडदा पडला.