
ऋषभ पंत गेल्या काही महिन्यांपासून फॉर्म मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर झालेल्या दुखापतीनंतर फॉर्म मिळवणं कठीण झालं आहे. टी20 संघातून डावलल्यानंतर आता वनडे संघातील स्थानही संकटात आलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पंतच्या ऐवजी संघात इशान किशनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याला कारणही तसंच आहे. विजय हजारे ट्रॉफीत ऋषभ पंतची बॅट काही चालली नाही. त्याच्या चाहत्यांना विश्वास होता की कमबॅक करेल. पण तसं झालं नाही. ओडिशाविरुद्धच्या सामन्यातही पंत फेल गेला. इतकंच विकेट त्याने प्रतिस्पर्धी संघाला गिफ्ट म्हणून दिल्याचं आता क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. फॉर्म तर नाहीच पण संघालाही पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
विजय हजारे ट्रॉफीत ओडिशाने 50 षटकात 8 गडी गमवून 272 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दिल्ली सहज गाठेल असं वाटलं होतं. पण दिल्लीचा डाव पत्त्यासारखा कोसळला. खरं तर कर्णधार ऋषभ पंतकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्याने चूक केली आणि संघ आणखी अडचणीत आला. दिल्लीने अवघ्या 6 धावांवर दोन गडी गमवले होते. त्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला आणि 27 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार मारत 24 धावा केल्या. पंत मोठी खेळी करेल असं वाटत होतं. पण पुढच्या चेंडूवरच बाद झाला. पंतने आतापर्यंत खेळलेल्या चार डावात फक्त 121 धावा केल्या आहे. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. दोन वेळा ऋषभ पंत चांगली खेळी करूनही मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला.
ऋषभ पंतच्या या बेजबाबदार खेळीमुळे त्याचं वनडे संघातील स्थान आता संकटात आलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 3 किंवा 4 जानेवारीला संघ निवड केला जाणार आहे. तत्पूर्वी दिल्लीचा संघ एक सामना खेळणार आहे. या सामन्यावर ऋषभ पंतचं पुढचं गणित ठरणार आहे. पण सध्याची स्थिती पाहता त्याच्या ऐवजी संघात इशान किशन किंवा ध्रुव जुरेलला स्थान मिळू शकते. ध्रुव जुरेलनेही विजय हजारे ट्रॉफीत चांगली कामगिरी केली आहे.