
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच वनडे मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा सेतू बांधला जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारताच्या कर्णधारपदाची सूत्र रोहित शर्माकडून शुबमन गिलकडे सोपवली आहेत. सूत्र सोपवली असली तरी संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची निवड केली आहे. त्यामुळे त्यांचा तालमेल कसा बसेल? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होत असून त्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. टीम इंडियाचा एक व्हिडीओ बीसीसीआयने पोस्ट केला आहे. त्याची चर्चा आता क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. कारण शुबमन गिलला कर्णधारपद सोपवल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पहिल्यांदाच आमनेसामने आले. या व्हिडीओत शुबमन गिलने पहिली भेट ही रोहित शर्माची घेतली. शुबमन गिल रोहितकडे जातो आणि त्याला मिठी मारतो.
व्हिडीओत रोहित शर्मा बसमध्ये बसण्यासाठी जातो तितक्यात त्याचं लक्ष विराटकडे जातं. तेव्हा रोहित त्याला वाकून सलाम करतो. विराट कोहलीही त्याला हसत उत्तर देतो. त्यानंतर विराट आणि गिलची भेट होते. गिल जसा बसमध्ये चढतो तसा विराटची भेट घेतो. विराट त्याच्यासोबत हातमिळवणी करून काही सांगतो आणि पाठीवर थाप देतो. शुबमन गिल कर्णधार झाल्याने रोहित आणि विराट दोघेही खूश दिसत आहेत. क्रीडाप्रेमींनी आतापर्यंत जो काही विचार केला होता. त्याच्या अगदी उलट झालं आहे.
𝙀𝙣 𝙧𝙤𝙪𝙩𝙚 𝘿𝙤𝙬𝙣 𝙐𝙣𝙙𝙚𝙧 ✈️
Of familiar faces and special reunions as #TeamIndia depart for the Australia challenge 😍#AUSvIND pic.twitter.com/ElV3OtV3Lj
— BCCI (@BCCI) October 15, 2025
दरम्यान, वनडे वर्ल्डकप 2027 च्या दृष्टीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतून त्यांच्या भवितव्याची चाचपणी होणार आहे. त्यांच्या खांद्यावर कोणतीच जबाबदारी नाही. त्यामुळे त्यांना आता संघातील स्थान हे मैदानातील कामगिरीवर टिकवावं लागणार आहे. दुसरीकडे, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाले नाहीत. रिपोर्टनुसार, सपोर्ट स्टाफसाठी वेगळं विमान ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. गौतम गंभीरसाठीही ऑस्ट्रेलिया दौरा खूपच महत्त्वाच आहे.