IND vs ENG : रोहितची सुपरहिट खेळी, शतकासह विक्रमांचा पाऊस, द्रविडसह अनेक दिग्गजांना पछाडलं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 12:07 AM

ओव्हल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे.

IND vs ENG : रोहितची सुपरहिट खेळी, शतकासह विक्रमांचा पाऊस, द्रविडसह अनेक दिग्गजांना पछाडलं
Follow us

लंडन : इंग्लंड दौऱ्यावर भारताचे इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, तर रोहित शर्मा वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहितने लॉर्ड्स आणि हेडिंग्ले येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी साकारल्या आणि अर्धशतके केली होती, पण तो त्या अर्धशतकांचे शतकांत रूपांतर करू शकला नाही. रोहितने ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात ही कामगिरी पूर्ण केली. (Rohit sharma hits first test century away from home and created many records ata Oval against England)

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने परदेशात कसोटीत शतक झळकावले नव्हते. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. 64 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले.

रोहितची अनेक विक्रमांना गवसणी

दरम्यान, रोहितची खेळी 127 धावांवर संपुष्टात आली आहे. मात्र त्याअगोदर त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. आजच्या शतकी खेळीसह रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतल्या 15000 धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने कसोटी कारकिर्दीतल्या 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने इंग्लंडविरोधात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच सलामीवीर म्हणून त्याने 11000 धावांचा डोंगर सर केला आहे. 2021 या वर्षात रोहितने 1000 आंतरराष्ट्रीय धावा जमवल्या आहेत.

रोहित नोव्हेंबर 2013 मध्ये कोलकाता येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, पण त्यानंतर तो कसोटीत परदेशी भूमीवर शतक झळकावू शकला नाही. ही कमतरता रोहितने यावेळी इंग्लंडमध्ये सात वर्षानंतर (2021) मध्ये पूर्ण केली. रोहितने षटकार मारून कसोटीत शतक पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ आहे.

राहुल द्रविडला टाकले मागे

रोहितचे परदेशी भूमीवरील आणि इंग्लंडमधील कसोटीतील हे पहिले कसोटी शतक असले तरी त्याने याआधी मर्यादित षटकांत इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावले आहे. तीनही फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडमधील त्याचे हे एकूण नववे शतक आहे आणि या बाबतीत त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. राहुलने इंग्लंडमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये एकूण आठ शतकं ठोकली आहेत. यासह, इंग्लंडमध्ये शतक झळकावणाऱ्या परदेशी फलंदाजांच्या यादीत तो व्हिव रिचर्ड्सच्या बरोबरीत उभा आहे.

रिचर्ड्सने इंग्लंडमध्ये एकूण नऊ शतके केली आहेत आणि रोहितने आज त्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन या दोघांच्या पुढे आहेत. खेळाच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा रोहित भारताचा दुसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी केएल राहुलने ही कामगिरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या भूमीवर कसोटी, टी -20 आणि एकदिवसीय या तीनही फॉरमॅटमध्ये शतके केली आहेत.

इतर बातम्या

मॅचनंतर दादा ही कामं करायला सांगायचा, केबीसीच्या सेटवर सेहवाग-गांगुलीचा कलगीतुरा, बिग बी बघतच राहिले!

तो परत आला… भारताच्या गोलंदाजीवेळी Jarvo 69 मैदानात, इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का!

Ind vs Eng : रोहित शर्माची तुफानी खेळी, विदेशी भूमीवर ठोकलं पहिलं शतक, षटकाराची परंपरा कायम

(Rohit sharma hits first test century away from home and created many records ata Oval against England)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI