रोहित शर्मा की हार्दिक पांड्या! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत एबी डिव्हिलियर्स याचं मोठं वक्तव्य
आयपीएल 2024 स्पर्धेचे आतापासूनच वेध लागले आहेत. दोन महिने चालणाऱ्या स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन होतं. षटकार आणि चौकारांचा वर्षाव, अतितटीचे सामने, थरार बरंच काही अनुभवता येतं. आयपीएल 2024 स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली असून संघांची पुर्नरचना केली जात आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धेसाठी 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असल्याची चर्चा आहे. पण त्यापूर्वी संघांनी ट्रान्सफर विंडो ओपन केली आहे. 26 नोव्हेंबर ट्रेडिंग करण्याची शेवटची तारीख आहे. या अंतर्गत दोन फ्रेंचाइसी एकमेकांच्या सहमतीने आवडीचे खेळाडू एकमेकांना ट्रेड करू शकतात. पण यासाठी खेळाडूंची परवानगी घेणंही महत्त्वाचं असतं. या अंतर्गत मुंबईच्या ताफ्यात हार्दिक पांड्याची एन्ट्री होऊ शकते. या बातमीला अधिकृत दुजोरा नसला तरी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मागच्या दोन पर्वात गुजरात टायटन्सला एका उंचीवर नेणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्स 15 कोटी खर्च करणार आहे. याबाबत अधिकृत माहिती रविवारी समोर येईल. या बातमीनंतर आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये आला तर कसं असेल गणित याबाबत सांगितलं आहे.
एबी डिव्हिलियर्सने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, “रोहित शर्मावर कसोटी आणि वनडे क्रिकेट संघाचा भार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद तो हार्दिक पांड्याकडे सोपवू शकतो. यामुळे त्याच्या कर्णधारपदाचा भार कमी होईल. मला फनी फिलिंग आहे की, रोहित शर्मा हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवेल.”
“हार्दिक पांड्या अनेक वर्षे मुंबई इंडियन्ससाठी खेळला. त्यामुळे हार्दिक पांड्या एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला वानखेडेवर खेळायला आवडतं. गुजरातसाठी त्याने किताब जिंकला आहे आणि पुढच्या पर्वात अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे असं वाटते की त्याची वेळ आली आहे.”, असं एबी डिव्हिलियर्स म्हणाला.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स चांगली कामगिरी करत असताना नेमकं काय बिनसलं अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आयपीएल पर्वात गुजराकडून मुंबई इंडियन्समध्ये परतू शकतो. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. लीगमध्ये 30.38 च्या सरासरीने 2309 धावा केल्या आहेत. यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याचा 91 ही सर्वोत्तम खेळी राहिली आहे. तर त्याने आयपीएलमध्ये 53 गडी बाद केले आहेत.