आयपीएल स्पर्धेला मुकल्यानंतर ऋतुराज गायकवाडने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘तरुण यष्टीरक्षक..’
आयपीएल 2025 स्पर्धेत पाच सामन्यात ऋतुराज गायकवाडने संघाचं नेतृत्व केलं. मात्र दुखापतीमुळे आता त्याला स्पर्धेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर दिली आहे. असं असताना ऋतुराज गायकवाडने आपल्या मनातली गोष्ट सर्वांसमोर उघड केली आहे.

आयपीएल स्पर्धेत पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या चेन्नई सुपर किंग्सची या स्पर्धेतील कामगिरी काही खास राहिलेली नाही. सुरुवातीच्या पाच सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळाला आहे. दुसरीकडे, कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या आयपीएल हंगामातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीचा सामना करताना ऋतुराजच्या कोपराला दुखापत झाली. त्यामुळे उर्वरित सामन्यांना मुकावं लागलं आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. यानंतर ऋतुराज गायकवाडने आपलं मत व्यक्त केलं आहे. ऋतुराज गायकवाड म्हणाला, ‘सर्वांना नमस्कार, मी ऋतुराज आहे. दुर्दैवाने, कोपराच्या दुखापतीमुळे आयपीएलमधील उर्वरित सामने मुकल्याबद्दल मला खूप वाईट वाटते.पण, तुमच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.’
‘या हंगामात आम्ही काही सामन्यांपासून संघर्ष करत आहोत. पण तुम्हाला माहिती आहेच की एक तरुण यष्टिरक्षक संघाचे नेतृत्व करणार आहे. मला आशा आहे की परिस्थिती बदलेल. मी संघासोबत असेन आणि त्यांना माझा पाठिंबा देईन. आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्यातून मला बाहेर पडायचे आहे. पण काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. पण मी डग-आउटमधून संघाला पाठिंबा देईन. मला या पर्वातील आगामी सामन्यांमध्ये चांगले निकाल मिळतील अशी आशा आहे. धन्यवाद,’ ऋतुराज गायकवाडने आपलं म्हणणं सीएसकेने त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मांडलं आहे.
Straight from Rutu’s soul! 🤳💛📹#WhistlePodu #AllYouNeedIsYellove 🦁💛 pic.twitter.com/PNIZBWR1yR
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 10, 2025
चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मात्र त्यानंतर सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चार सामने गमवल्याने आता चेन्नई सुपर किंग्सचं प्लेऑफचं गणित किचकट झालं आहे. अजूनही स्पर्धेतील 9 सामने खेळायचे आहेत. मात्र त्यापैकी काहीही करून 7 सामने जिंकावे लागणार आहेत. जर हे गणित चुकलं तर मात्र सहा सामन्यात विजय मिळवून नेट रनरेटच्या आधारे प्लेऑफमध्ये स्थान मिळवावा लागेल. आता ही परिस्थिती कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी कशी हाताळतो याकडे लक्ष लागून आहे.
