
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता टीम इंडिया मायदेशात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20I मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. या मालिकेत 2 सामने खेळवण्यात येणार आहे. टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर युवा शुबमन गिल याच्या खांद्यावर भारतीय संघाची धुरा आहे. मालिकेतील पहिला सामना हा 14 नोव्हेंबरपासून होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे कोलकातमधील ईडन गार्डन्समध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाचा वेगवान आणि अनुभवी फलंदाज जसप्रीत बुमराह याला या मालिकेत खास कामगिरी करण्याची संधी आहे.
बुमराहकडे भारताचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कसोटी विकेट्सबाबत मागे टाकण्याची संधी आहे. मोहम्मद शमी याला मागे टाकण्यासाठी बुमराहला फक्त नि फक्त 4 विकेट्सची गरज आहे. त्यामुळे बुमराह शमीला पहिल्या कसोटीत मागे टाकेल, असं निश्चित समजलं जात आहे. शमीला या मालिकेसाठी देशांतर्गत क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीनंतरही संधी देण्यात आली नाही.
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह दोघेही अनुभवी आणि स्टार बॉलर आहेत. दोघांनीही भारताला अनेकदा विजयी केलं आहे. मात्र शमी सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहे. तर बुमराह सातत्याने खेळतोय. त्यामुळे बुमराह शमीच्या कसोटी विकेट्सच्या आणखी जवळ येऊन पोहचला आहे. शमी आणि बुमराह यांच्यात फक्त 3 टेस्ट विकेट्सचा फरक आहे. बुमराहने 226 तर शमीने 229 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे बुमराह चौथी विकेट घेताच तो शमीला मागे टाकेल.
जसप्रीत बुमराह याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 8 कसोटी क्रिकेट सामने खेळला आहे. बुमराहने या 8 सामन्यांमध्ये 20.76 च्या सरासरीने एकूण 38 विकेट्स मिळवल्या आहेत. बुमराहचा या दरम्यान इकॉनमी रेट हा 2.97 इतका आहे. बुमराहच्या या इकॉनमी रेटवरुन तो कशाप्रकारे बॉलिंग करतो, याचा अंदाज येतो.
विशेष म्हणजे बुमराहने आजपासून 7 वर्षांआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच कसोटी पदार्पण केलं होतं. बुमराह कसोटी कारकीर्दीतील आपला पहिला सामना हा केपटाऊनमध्ये खेळला होता. आता बुमराह मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.