मँचेस्टरमधील ड्रॉवरील वादावर अखेर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मौन सोडले, स्पष्टच सांगितलं की…
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. खरं तर या तिसऱ्या कसोटीपर्यंत इंग्लंडच्या पारड्यात सर्व काही होतं. पण मँचेस्टर कसोटीनंतर सर्व काही बदललं. त्या कसोटी ड्रॉवरून वाद झाला. आता यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मौन सोडले आहे.

भारताने इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. पहिल्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यामुळे ही मालिका इंग्लंडच जिंकेल असा विश्लेषकांचा दावा होता. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं आणि मालिका 1-1 अशा स्थितीत आणून ठेवली. तिसऱ्या कसोटीतही भारताने यशस्वी झुंज दिली. खरं तर हा सामना भारत जिंकेल अशीच स्थिती होती. पण तिसर्या सामन्यात भारताला 22 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा भक्कम स्थितीत आला. चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यात जिंकण्याची पुरेपूर संधी होती. त्यात भारतीय संघ या दोन्ही सामन्यात दडपणाखाली होता. पण भारताने इंग्लंडचं विजयाचं स्वप्न पाचव्या कसोटीवर नेलं. चौथा कसोटी सामना भारताने दोन दिवस फलंदाजी करून ड्रॉ केला. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. पण हा सामना ड्रॉ करावा असा दबाव इंग्लंडचे खेळाडू भारतीय खेळाडूंवर टाकत होते.
इंग्लंडचा संघ गोलंदाजांना जास्त थकवू नये यासाठी प्रयत्नशील होता. बेन स्टोक्स जडेजा आणि सुंदरला हस्तांदोलन करून सामना संपण्याची इच्छा व्यक्त करत होता. पण भारतीय संघाने या दोघांचं शतक होईपर्यं सामना लांबवला. आता यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मौन सोडलं आहे. सचिन रेडिटशी बोलताना म्हणाला की, ‘टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन का करावं? त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना हस्तांदोलन करून विश्रांती का द्यावी? जर इंग्लंडला हॅरी ब्रूक गोलंदाजी करू इच्छित असेल तर ती कर्णधाराची निवड आहे. भारताची समस्या नाही. वॉशिंग्टन आणि जडेजाने शतक झळकावले. ही योग्य क्रीडा भावना नाही? ते त्यांच्या शतकासाठी नाही तर ड्रॉसाठी खेळत होते. जर ते क्रिजवर येताच बाद झाले असते तर आपण तिथून सामना गमावू शकलो असतो.‘
चौथ्या कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर भारताच्या तुलनेत इंग्लंडकडे दोन संधी होत्या. एक तर सामना जिंकला की मालिका खिशात जाणार होता. तसेच ड्रॉ झाला तरी मालिका विजयाची चव चाखता आली असती. पण भारताने शेवटचा कसोटी सामना 6 धावांनी जिंकला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली.
