भारत इंग्लंड कसोटी मालिकेतून डावललं, पण संधी मिळाली आणि पुन्हा ठोकलं शतक
भारत इंग्लंड दौरा संपला असून आता आशिया कप स्पर्धेचे वेध लागले आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा धडाका सुरु झाला आहे. असं असताना ज्या खेळाडूला इंग्लंड दौऱ्यासाठी डावललं. त्याने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे.

भारताने इंग्लंड दौऱ्यात अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली आणि मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. या मालिकेत काही खेळाडूंनी पदार्पण केलं. पण त्यांची कामगिरी संमिश्र राहिली. दुसरीकडे, या संघात सर्फराज खानला काही संधी मिळाली नाही. पण जेव्हा कधी त्याला संघात संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. आता सरफराज खानने पुन्हा एकदा टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे. त्याने शतकी खेळी करत निवड समितीला विचार करण्यास भाग पाडलं आहे. आशिया कप स्पर्धेत तर स्थान मिळणं कठीण आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा केला आहे. बुचीबाबू ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडू भविष्याची किल्ली शोधत आहेत. सरफराज खान मुंबईसाठी खेळत आहे. त्याने टीएनसीएविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करत दावा ठोकला आहे. सरफराज खानने 92 चेंडूत शतक ठोकलं.
सरफराज खान फलंदाजीसाठी आला तेव्हा मुंबईने 98 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. मुंबईचा संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत सरफराज खानने खेळपट्टीवर तग धरला आणि चांगाली फलंदाजी केली. फिटनेसनंतर सरफराज खान पहिल्यांदा मैदानात उतरला होता. त्याने आपलं वजन कमी केलं असून फीटही दिसत आहे. दोन महिन्यात त्याने 17 किलो वजन कमी केलं. त्यामुळे त्याच्या इच्छाशक्तीचं कौतुक होत आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेही त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक केलं होतं. पण मैदानात कधी उतरेल याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना होती. अखेर उतरला आणि त्याने शतक ठोकत करून दाखवलं.
ऑक्टोबर महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा सप्टेंबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे सरफराज खानला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड दौऱ्यातील काही खेळाडूंची नावं कमी होण्याची शक्यता आहे. त्यात ऋषभ पंत जखमी असल्याने या मालिकेत फीट झाला नाही तर त्याला संधी मिळू शकते. विकेटकीपर फलंदाज म्हणून त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा करूण नायर आणि साई सुदर्शन यांच्या जागी संघात स्थान मिळवू शकतो.
