
भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधाराला गेल्या सामन्यांपासून क्रिकेटमध्ये सूर काही सापडत नाही. त्यामुळे फलंदाजीला धार करण्यासाठी देशांतर्गत रणजी ट्रॉफीत घाम गाळत आहे. पण यातही शुबमन गिलच्या हाती काही लागलं नाही. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातील दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावात तर त्याला खातं खोलता आलं नाही. तर दुसऱ्या डावात फक्त 14 धावांवर खेळ आटोपला. दोन्ही डावात त्याला पार्थ भूतने तंबूचा रस्ता दाखवला. दोन्ही डावात पार्थ भूतने त्याला पायचीत करत बाद केलं. त्यामुळे शुबमन गिलच्या फलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शुबमन गिल फक्त पाटा विकेटवरच धावा करू शकतो असा आरोपही काही जण करत आहेत. गोलंदाजीसाठी पुरक असलेल्या विकेटवर तग धरणं कठीण असल्याची टीकाही अनेकांनी केली आहे. त्यामुळे तो टीकेचा धनी ठरला आहे. दुसरीकडे पार्थ भूतची चर्चा रंगली आहे. कोण हा खेळाडू जाणून घ्या.
रणजी ट्रॉफीत पार्थ भूतने पंजाबच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. राजकोटमधील सामन्यात पहिल्या डावात फक्त 33 धावा देऊन 5 विकेट काढल्या. तर दुसऱ्या डावाता 8 धावा देत 5 जणांना तंबूचा रस्ता दाखवला. पार्थ भूतच्या गोलंदाजीमुळे सौराष्ट्रचा संघ मजबूत स्थितीत आला. त्याच्या गोलंदाजीमुळे दुसऱ्या दिवशीच पंजाबचा पराभव झाला. सौराष्ट्रने पहिल्या डावात 172 धावा केल्या होत्या. त्या बदल्यात पंजाबने 139 धावांची खेळी केली. सौराष्ट्रीकडे 33 धावांची आघाडी होती. तर दुसऱ्या डावात सौराष्ट्रने 286 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडीसह 319 धावांचं आव्हान दिलं. पण पंजाबचा संघ फक्त 125 धावा करू शकला . सौराष्ट्रने हा सामना 194 धावांनी जिंकला.
पार्थ भूत डावखुरा फिरकीपटू आहे. त्याने 2019 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पार्थ भूतचं क्रिकेटमधील पदार्पण सोपं नव्हतं. कारण तो गुजरातच्या जुनागडमध्ये राहणारा आहे. त्या भागात क्रिकेट अकादमीची सुविधा नव्हती. त्यात घरातून क्रिकेट खेळणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे त्याला बाळकडूही मिळालं नव्हतं. पण पार्थने स्वत:च्या हिमतीवर क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला. तसेच सौराष्ट्र संघात जागा मिळवली. पार्थ भूतने सौराष्ट्रसाठी 21 फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळले आहे. त्यात 66 विकेट घेतल्या आहेत. सातवेळा पाच विकेट घेण्याची किमया केली आहे. 18 लिस्ट ए सामन्यात 20 विकेट घेतल्यात. फर्स्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि एक अर्धशतकही आहे.