SMAT 2025 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ऐनवेळी मैदान बदलण्याची वेळ, हार्दिक पांड्यामुळे घेतला निर्णय
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत अचानक मैदान बदलण्याची वेळ आली. गुजरात विरुद्ध बडोदा सामन्यात हा निर्णय घेतला गेला. हा सामना आधी जिमखान ग्राउंडवर होणार होता. त्यानंतर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात शिफ्ट केला गेला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेतील हैदराबाद येथे आयोजित केलेल्या सामन्याचं ठिकाण ऐनवेळी बदलण्यात आलं. शक्यतो असं कधी होत नाही. पण अधिकाऱ्यांना हा निर्णय घ्यावा लागला. त्याचं कारण ठरला तो हार्दिक पांड्या… गुजरात विरुद्ध बडोदा सामना हैदराबादच्या जिमखाना ग्राऊंडवर होणार होता. पण हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये शिफ्ट केला गेला. हे मैदानाआंतरराष्ट्रीय आणि आयपीएल सामन्यांसाठी वापरलं जातं. इतकंच काय या स्टेडियमची सुरक्षा व्यवस्थाही चोख आहे. या ठिकाणी गर्दीचं नियंत्रण करणंही सोपं जातं. त्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी हे मैदान चांगला पर्याय ठरतं. पण मैदान बदललं का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं कारण समजून घेऊयात. या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी होते. तसेच हार्दिक पांड्याला पाहून उत्साहही संचारला होता.
आयोजकांच्या मते, हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी झाली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बडोदा विरुद्ध गुजरात सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये शिफ्ट करावा लागला. कारण सामन्यात कोणत्याही अडचण येऊ नये आणि सामना सुरळीत पूर्ण व्हावा यासाठी हा निर्णय घेतला गेला. टीम हॉटेल, सराव मैदान आणि तिकीट काउंटरबाहेर चाहत्यांची गर्दी फार मोठी होती. सामान्य देशांतर्गत सामन्यांपेक्षा कित्येक पट जास्त होती. पंजाब विरूद्धच्या सामन्यातही हार्दिक पांड्या फलंदाजी करत असताना एक चाहता सेल्फीसाठी घुसला होता. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत त्याला पकडलं होतं. पण हार्दिकने त्याला थांबवून सेल्फी घेतला होता.
राजीव गांधी मैदानात पार पडलेल्या सामन्यात बडोद्याने गुजरातला 8 गडी राखून पराभूत केलं. बडोद्याने हा सामना फक्त 40 चेंडूत जिंकला. या सामन्यात हार्दिक पांड्याने जबरदस्त खेळी केली. हार्दिकने चार षटकं टाकली आणि 16 धावा देत एक गडी बाद केला. दरम्यान, पुढच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार नाही. कारण भारतीय संघ आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 9 डिसेंबरपासून होणार आहे.
