VIDEO : श्रीलंकेच्या प्रशिक्षकाचा भर मैदानात थयथयाट, पराभवानंतर कर्णधारासोबत बाचाबाची

Deepak Chahar : श्रीलंकेच्या 276 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताची अवस्था 7 बाद 193 अशी झाली होती. या परिस्थितीतून दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी संयमी खेळी करत विजय खेचून आणला.

VIDEO : श्रीलंकेच्या प्रशिक्षकाचा भर मैदानात थयथयाट, पराभवानंतर कर्णधारासोबत बाचाबाची
india-vs-sri-lanka Mickey Arthur

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या थरारक वन डे सामन्यात टीम इंडियाचा (Indian Cricket Team) गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) फलंदाजीत कमाल केली. भारताने दुसऱ्या सामन्यात 3 विकेट्स राखून थरारक विजय तर मिळवलाच, पण मालिकाही खिशात घातली. हा सामना भारताने गमावल्याचं चित्र होतं. मात्र दीपक चहरच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने श्रीलंकेच्या जबड्यातून हा विजय खेचून आणला.  (Sri Lanka coach Mickey Arthur loose control on pitch argument with SL captain Dasun Shanaka after India win Deepak Chahar great nock)

श्रीलंकेच्या 276 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताची अवस्था 7 बाद 193 अशी झाली होती. या परिस्थितीतून दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी संयमी खेळी करत विजय खेचून आणला. चहर 82 चेंडूत 69 धावा करुन नाबाद राहिला. तर भुवनेश्वरनेही 28 चेंडूत 19 धावा करुन तो सुद्धा नाबाद राहिला.

या पराभवानंतर श्रीलंकेचे कोच मिकी ऑर्थर (Mickey Arthur) चांगलेच नाराज आले. भारताच्या प्रत्येक विकेटनंतर कोच मिकी ऑर्थर हुरळून जात होते. मात्र भारताच्या विजयानंतर त्यांचा चेहराच उतरला. पराभवामुळे लालबुंद झालेले कोच ऑर्थर हे भर मैदानातच श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाशी (Dasun Shanaka) भिडले. दोघांच्या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मिकी ऑर्थर आणि दासुन शनाका हे एकमेकांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. ऑर्थर हे कर्णधार शनाकाला काहीतरी जाब विचारत आहे असं दिसत आहे. मात्र शनाका त्यांना समजावत आहे. मात्र तणतण करत ऑर्थर हे मैदानाबाहेर गेले.

दरम्यान, या व्हिडीओनंतर श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू रसेल आर्नोल्डने ट्वीट करुन नाराजी वर्तवली आहे. कोच आणि कर्णधारामधील अशाप्रकारचा संवाद हा मैदानात नाही तर ड्रेसिंग रुममध्ये व्हायला हवा, असं आर्नोल्ड म्हणाला.

भारताचा थरारक विजय 

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत विरुद्ध श्रीलंकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात केली आहे. दीपक चाहरने 82 चेंडूत 69 धावांची मॅच विनिंग खेळी साकारली. तर सूर्यकुमार यादवनेदेखील (53) अर्धशतकी खेळी करत आपलं योगदान दिलं. सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहरच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेने दिलेलं 275 धावांचं आव्हान 3 विकेट्स आणि 5 चेंडू राखून पूर्ण केलं. या विजयासह भारताने उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंनी श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या 

दीपक चहरसाठी राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज आणि भारताने सामना जिंकला, वाचा नेमकं काय घडलं…?

दीपक चाहर-सूर्यकुमारची अर्धशतकं, चुरशीच्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर 3 विकेट्सने मात, मालिका भारताच्या खिशात