काव्या मारनच्या एका निर्णयाने खेळाडूंचं होणार कोट्यवधींचं नुकसान

आयपीएल 2025 स्पर्धेतून सनरायझर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत हैदराबाद संघाला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 14 पैकी फक्त 6 सामन्यात विजय मिळवला आणि स्पर्धेतील आव्हान संपलं. आता संघ मालकीन काव्या मारन आणि व्यवस्थापक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

काव्या मारनच्या एका निर्णयाने खेळाडूंचं होणार कोट्यवधींचं नुकसान
Image Credit source: PTI
| Updated on: May 26, 2025 | 5:43 PM

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आणि भल्याभल्यांना घाम फोडला. या संघात असलेली मजबूत बॅटिंग लाइनअप आणि भेदक गोलंदाजीची बाजू पाहता कोणालाही असंच वाटलं असतं. पण त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने लय गमावली आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली. आता सनरायझर्स हैदराबादसाठी हे पर्व संपलं आहे. पण संघ मालकीन काव्या मारन आणि मॅनेजमेंट काही मोठे निर्णय घेणअयाची शक्यता आहे. यात सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. आयपीएल फ्रेंचायझी प्रत्येक पर्वानंतर अपेक्षा पूर्ण करू न शकलेल्या खेळाडूंना रिलीज करते.. तसेच ट्रेड विंडोच्या माध्यमातून नव्या खेळाडूंना संघात सहभागी केलं जाण्याची शक्यता आहे. सनरायझर्स हैदराबादची नजर आता मिनी लिलावाकडे असणार आहे. त्यामुळे काही खेळाडूंना रिलीज करण्यासाठी खलबतं सुरु झाल्याचं बोललं जात आहे. यात मोहम्मद शमी आणि कामिंदु मेंडिस यासारख्या मोठ्या खेळाडूंचं नाव असण्याची शक्यता आहे.

मोहम्मद शमी या पर्वात 9 सामन्यात फक्त 6 विकेट घेऊ शकला. तर त्याचा इकोनॉमी रेटही 11 पेक्षा जास्त आहे. तर कामिंदु मेंडिसने पाच सामन्यात 92 धावा केल्या आणि फक्त 2 विकेट घेण्यात यश आलं. अथर्व तायडेलाही रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. त्याला खेळण्याची हवी तशी संधी मिळाली नाही. पण जेव्हा मिळाली तेव्हा छाप सोडता आली नाही. त्याला फक्त एकदाच प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली. त्यानंतर संघाने त्याच्यावर जास्त विश्वास टाकला नाही. त्यामुळे त्याला रिलीज केलं जाऊ शकतं. सचिन बेबी याने देखील एकच सामना खेळला. पण संघ रणनितीत त्याचा जागा कुठे तयार होताना दिसली नाही. राहुल चाहर आणि वियान मूल्डर यांनीही प्रत्येक एक सामना खेळला. त्यामुळे यांचं नावही रिलीज यादीत असू शकतं.

सनरायझर्स हैदराबाद 2026 आयपीएल स्पर्धेत काही खेळाडूंना कायम ठेवणार हे जवळपास पक्कं आहे. या स्पर्धेतील कामगिरी पाहता निर्णय घ्यावा लागणार आहे. यात हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांना कायम ठेवणार आहे. मेगा लिलावापूर्वी या खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामुळे त्यांना काही हात लागणार नाही. दुसरीकडे, इशान किशन आणि हर्षल पटेल यांनाही संघात कायम ठेवतील. कारण या दोघांनी या स्पर्धेत छाप सोडली आहे.