पाकिस्तानला भारताविरूद्धचा सामना खेळावा लागणार? नेदरलँडमुळे सुपर 8 फेरीचं गणित बिघडलं

T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडवर निसटता विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानची पुरती हवा निघून गेली आहे. आता भारताविरुद्ध सामना खेळण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानला भारताविरूद्धचा सामना खेळावा लागणार? नेदरलँडमुळे सुपर 8 फेरीचं गणित बिघडलं
Image Credit source: ICC/PTI
| Updated on: Feb 07, 2026 | 6:02 PM

IND vs PAK, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडला 3 विकेट आणि 3 चेंडू राखून पराभूत केलं. या विजयामुळे पाकिस्तानचा पुढचा प्रवास कठीण झाला आहे. कारण या सामन्यात पाकिस्तानला 2 गुण मिळाले. पण नेट रनरेट काही चांगला करू शकले नाहीत. त्यामुळे भारताविरूद्धचा सामना खेळला नाही आणि एका सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे पाकिस्तान भारताविरूद्धचा सामना खेळू शकते. पाकिस्तान अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून असणार आहे. या सामन्यातील निकाल भारताविरुद्ध खेळायचं की नाही हे स्पष्ट करणार आहे. पण सध्याची स्थिती पाहता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हा निर्णय बदलावा लागू शकतो. पाकिस्तानचे सध्या गुणतालिकेत 2 गुण असून +0.240 नेट रनरेट आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला एक पराभव महागात पडू शकतो. त्यामुळे भारताविरूद्ध खेळण्याशिवाय पर्याय उरणार नाही. दुसरीकडे, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने पावलं उचलली आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विनंती केली आहे. 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणाऱ्या भारताविरूद्धच्या सामन्यात खेळावं अशी अपील केली आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने पीसीबीला ईमेल पाठवला असून त्यात स्पष्ट सांगितलं की, हा सामना झाला नाही तर श्रीलंका क्रिकेटला गेट मनी, हॉस्पिटॅलिटी विक्री आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या मिळकतीवर परिणाम होईल. इतकंच काय तर श्रीलंकेकडे यजमानपद असल्याने त्यावरही प्रभाव पडेल. यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांना संपर्क केला आहे. तसेच पाकिस्तानकडून सकारात्मक प्रतिसादाची विनंती केली आहे.

रिपोर्टनुसार, मोहसिन नकवी यांनी शम्मी सिल्वा यांच्या विनंतीला मान देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मोहसिन नकवी यांनी सांगितलं की, पाकिस्तान सरकारसोबत चर्चा करू आणि लवकरच उत्तर देऊ. हा ईमेल पंतप्रधानांसमोर ठेवू आणि सोमवारपर्यंत शेवटचा काय तो निर्णय घेऊ. भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कोलंबोत जाणार आहे. यात काही शंका नाही. पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला नाही तर भारताला दोन गुण मिळतील.