IND vs WI : अहमदाबाद कसोटीआधी भारताला झटका;खेळाडूला दुखापत! कुलदीप-जसप्रीतबाबत अपडेट काय?
India vs West Indies, 1st Test: टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटा मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 2 ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथे कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

भारतीय संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपल्या पहिल्या मालिका विजयाची प्रतिक्षा आहे. टीम इंडियाने या साखळीतील आपली पहिली मालिका बरोबरीत सोडवली. टीम इंडियाने इंग्लंडला इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्यापासून रोखलं. टीम इंडियाने पाचवा आणि अंतिम सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. त्यानंतर आता टीम इंडिया आपल्या दुसर्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्ध भिडणार आहे. उभयसंघात एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिकेतील सलामीचा सामना हा 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला काही तास बाकी असताना भारतीय संघाला मोठा झटका लागला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा बॉलिंग ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टनच्या बोटाला दुखापत झाली आहे. वॉशिंग्टनला सरावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे वॉशिंग्टनला बुधवारी 1 ऑक्टोबरला सराव सत्रात हजर राहता आलं नाही.
यॉर्कर किंग आणि चायनामॅन बॉलर सज्ज
पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू कुलदीप यादव या दोघांनी जोरदार सराव केला. कुलदीप आणि बुमराह या दोघांनी बराच वेळ नेट्समध्ये घाम गाळला. सरावादरम्यान दोघेही चांगल्या लईत दिसत होते. त्यामुळे हे दोघेही पहिल्या सामन्यात खेळणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे.
सिराज-प्रसिधकडून बॅटिंगचा सराव
तसेच इंग्लंड दौऱ्यातील टीम इंडियाची स्टार जोडी मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांनीही प्रॅक्टीस केली. विशेष म्हणजे या जोडीने बुधवारी 1 ऑक्टोबरला बॅटिंगचाही सराव केला.
रवींद्र जडेजावर अतिरिक्त जबाबदारी, शुबमनकडे नजरा
दरम्यान टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा या मालिकेत वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. जडेजा भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. नियमित उपकर्णधार ऋषभ पंत दुखापतीमुळे या मालिकेचा भाग नाही. त्यामुळे जडेजाकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तसेच शुबमन गिल याची कर्णधार म्हणून भारतातील ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. शुबमनने इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांमध्ये एकूण 754 धावा केल्या होत्या. आता शुबमन हा तडाखा भारतातही कायम ठेवणार का? याकडे लक्ष असणार आहे.
