2600sq फूट एरिया, 3 पार्किंग..,झहीर-सागरिकाकडून मुंबईत आलिशान घर खरेदी, किंमत किती?
Zaheer Khan and Sagrika Ghatge Mumbai Apartment : क्रिकेटर आणि अभिनेत्री या जोडीने मुंबईतील लोअर परळमध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या घराची स्टॅम्प ड्यूटीच इतकी आहे की तेवढ्या किंमतीत मुंबईत 1 बीएचके फ्लॅट मिळेल. जाणून घ्या.

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज ‘श्रीरामपूर एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणारा झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे हे दोघे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. दोघेही चर्चेत येण्याचं कारण म्हणजे खरेदी लक्झरी घर. झहीर आणि सागरिका या दोघांनी मुंबईत तब्बल 11 कोटी रुपये खर्चून आलिशान घर घेतलं आहे. झहीर आणि सागरिका घाटगे हीचा भाऊ शिवजीत घाटगे हे दोघे घर खरेदी करताना उपस्थित होते. या लक्झरी घराचं कारपेट एरिया हा 2 हजार 158 तर बिल्ड अप एरिया हा 2 हजार 590 स्क्वेअर फूट इतकं आहे.
रियल इस्टेट एडव्हायजर स्क्वेअर यार्ड्सनुसार, झहीर-सागरिका यांच्या घराच्या नोंदणीसाठी कागदपत्रांची पडताळणी केली आहे. त्यानुसार फेब्रुवारी 2025 मध्ये व्यवहार झाला आहे. झहीर-सागरिका यांनी खरेदी केलेल्या घराचं नोंदणी शुल्क हे लाखांच्या घरात असून तेवढ्या किंमतीत मुंबईसारख्या ठिकाणी 1 बीएचके फ्लॅट येईल. स्क्वेअर यार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, झहीर-सागरिका यांना 66 लाख रुपये मुद्रांक शुल्क म्हणून द्यावे लागले आहेत. तर नोंदणी शुल्क म्हणून 30 हजार रुपये मोजावे लागले आहेत.
झहीर-सागरिका यांनी खरेदी केलेलं त्यांचं आलिशान घर हे मुंबईतील लोअर परळ येथील इंडियाबुल्स स्काय येथे आहे. ‘इंडियाबुल्स स्काय’ इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट लिमिटेडद्वारे विकसित करण्यात आलं आहे. या आलिशान घराचा कारपेट एरिया हा 2 हजार 158 स्क्वेअर फूट इतकं आहे. तर बिल्डअप एरिया 2 हजार 590 स्क्वेअर फूट इतका आहे. यामध्ये 3 कार पार्किंगची सोय आहे.
रेरानुसार, ‘इंडियाबुल्स स्काय’ एकूण 3 एकरमध्ये विकसित करण्यात आली आहे. ‘इंडियाबुल्स स्काय’ ‘रेडी टु मूव इन’ हाउसिंग प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमधील रिसेल प्रॉपर्टीची सरासरी किंमत ही 49 हजार 96 रुपये प्रति स्क्वेअर फूट इतकी आहे.
झहीर खान आणि सागरिका घाटगेबाबत थोडक्यात
दरम्यान झहीर खान आणि सागरिका घाटगे या दोघांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. झहीर खानने टीम इंडियाचं एकूण 92 कसोटी, 200 एकदिवसीय आणि 17 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच झहीर 2011 साली जिंकलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप संघाचा सदस्य होता. तसेच झहीरने आयपीएलमध्ये विविध संघांकडून एकूण 100 सामने खेळले आहेत. झहीर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर कोचिंग करतोय. झहीरला नुकतंच आयपीएलमधील लखनऊ संघाचा मेन्टॉर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. तर सागरिका घाटगे हीने चक दे इंडिया, फॉक्स,मिले ना मिले हम, प्रेमाची गोष्ट, इरादा, स्माईल प्लीज या सिनेमांमध्ये अभिनयाची छाप सोडली आहे. झहीर खान आणि सागरिका घाटगे हे दोघे 2017 साली विवाहबद्ध झाले होते. त्याआधी दोघांनी एकमेकांना डेट केलं होतं.