Asia Cup 2025 : टीम इंडियाचा टी 20 आशिया कप स्पर्धेतील विराट रेकॉर्ड कोण ब्रेक करणार?
T20 Asia Cup Highest Score Record : टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा 2022 नंतर पहिल्यांदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेतील सामने होणार आहेत. भारताने 2022 साली महारेकॉर्ड केला होता. जाणून घ्या.

आशिया कप 2025 स्पर्धेत 8 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात 8 संघ खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे. यूएईकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. यजमान यूएई, पाकिस्तान, ओमान आणि टीम इंडिया हे 4 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. तर अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि हाँगकाँग बी ग्रुपमध्ये आहेत. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. त्यामुळे भारतासमोर यंदा ही ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे.
याआधी 2022 साली आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने खेळवण्यात आली होती. विशेष म्हणजे टी 20 फॉर्मेटने झालेल्या आशिया कप स्पर्धेत फक्त एकदाच एका डावात 200 पेक्षा अधिक धावा केल्या गेल्या आहेत. हा खास विक्रम भारतीय संघाच्याच नावावर आहे. त्यामुळे यंदा भारताचा हा रेकॉर्ड कोणता संघ ब्रेक करणार का? तसेच भारतीय संघ आणखी मोठी धावसंख्या करुन आपला विक्रम आणखी भक्कम करणार का? याची उत्सुकताही क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.
टीम इंडियाचं द्विशतक
टीम इंडियाने 3 वर्षांपूर्वी 200 पार मजल मारली होती. टीम इंडियाने 8 सप्टेंबर 2022 रोजी 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 212 धावा केल्या होत्या. तेव्हा भारतासाठी विराट कोहली याने शतक ठोकलं. होतं. विराट यासह टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारा पहिला भारतीय तर एकूण दुसरा फलंदाज ठरला होता.
विराट कोहली याने तेव्हा 122 धावांची खेळी केली होती. तर केएल राहुल याने 62 धावा जोडल्या होत्या. ऋषभ पंतने 20 आणि सूर्याने 6 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र अफगाणिस्तानला 213 धावांचा पाठलाग करताना 150 पर्यंतही पोहचता आलं नव्हतं. अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 111 धावा केल्या होत्या. भारताने अशाप्रकारे हा सामना 101 धावांनी जिंकला होता.
पाकिस्तान दुसऱ्या स्थानी
टी 20 आशिया कप स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्येबाबत भारतानंतर पाकिस्तानचा नंबर आहे. पाकिस्तानने 2022 साली हाँगकाँग विरुद्ध 193 धावा केल्या होत्या.
दरम्यान आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने हे दुबई आणि अबुधाबी येथील स्टेडियममध्ये होणार असल्याचं काहीच दिवसांपूर्वी एसीसीने जाहीर केलं होतं. या स्पर्धेत एकूण 8 संघात एकूण 19 टी 20 सामने होणार आहेत. हे सर्व सामने दुबई क्रिकेट स्टेडियम आणि शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
