Team India आशिया कप 2025 स्पर्धेत इतके मॅचेस खेळणार, पाकिस्तान विरुद्ध किती वेळा भिडणार?
Asia Cup 2025 Team India vs Pakistan : क्रिकेट चाहत्यांना आशिया कप 2025 स्पर्धचे वेध लागले आहेत. या स्पर्धेला आता 1 महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. भारतीय संघ या स्पर्धेत एकूण किती सामने खेळणार? जाणून घ्या.

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात होणार आहे. तर टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबरपासून करणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना हा यूएई विरुद्ध खेळणार आहे. तर अंतिम सामना हा 28 सप्टेंबरला होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यंदा आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत किमान 3 तर जास्तीत जास्त 7 सामने खेळू शकते.
8 संघ आणि 2 गट
यंदा आशिया कप स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी 8 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. या 8 संघामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, हाँगकाँग आणि ओमानचा समावेश आहे. या संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागलं आहे.
श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग टीम ब गटात आहे. तर भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा अ गटात समावेश करण्यात आला आहे.
साखळीनंतर सुपर फोरचा थरार
आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर सुपर 4 मध्ये प्रत्येक संघात एकमेकांविरुद्ध 1-1 सामना होईल. तसेच सुपर 4 मध्ये दोन्ही गटातील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
टीम इंडिया साखळी फेरीत 3 सामने खेळणार असल्याचं निश्चित आहे. तसेच सुपर 4 मध्ये पोहचल्यास भारतीय संघ आणखी 3 सामने खेळणार असल्याचं निश्चित होईल. तसेच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचल्यास एकूण 7 सामने होतील.
भारत-पाकिस्तान किती सामने?
दोन्ही कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे उभयसंघात साखळी फेरीत 1 सामना होणार असल्याचं निश्चित आहे. तसेच दोन्ही संघ सुपर 4 मध्ये पोहचल्यास पुन्हा आमनासामना होईल. तसेच दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहचल्यास महामुकाबला होईल. अशाप्रकारे उभयसंघात किमान 1 तर जास्तीत जास्त 3 सामने होण्याची शक्यता आहे. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे हा सामना रद्दही होऊ शकतो.
