ईशान किशनचं इंग्लंडमध्ये पदार्पण, लीड्समधील सामन्यादरम्यान या संघाकडून नव्या प्रवासाला सुरुवात
Ishan Kishan Debut : ईशान किशन टीम इंडियातून गेली अनेक महिने बाहेर आहे. अशात ईशान किशन याने टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान एका संघाकडून पदार्पण केलं आहे. जाणून घ्या.

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने एका नव्या संघाकडून पदार्पण केलं आहे. एका बाजूला टीम इंडिया लीड्समध्ये इंग्लंड विरद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला ईशानने 22 जून रोजी आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ईशान किशन याची इंग्लंड लायन्स विरूद्धच्या 2 सराव सामन्यासाठी इंडिया ए टीममध्ये निवड करण्यात आली होती. मात्र ईशानला संधी मिळाली नाही. ईशान किशन टीम इंडियातून डिसेंबर 2023 पासून दूर आहे. ईशान किशन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. मात्र ईशानने तेव्हा वैयक्तिक कारणामुळे टीममधून माघारी घेतली होती. आता ईशान नॉटिंघमशर टीमकडून काउंटी चॅम्पियनशीपमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी उतरला आहे.
ईशान काउंटी चॅम्पियनशीपमध्ये यॉर्कशायर विरुद्ध ट्रेंटब्रिजमध्ये मैदानात उतरला आहे. ईशानचा नॉटिंघमशरसह 2 सामन्यांसाठी करार झाला आहे. दक्षिण आफ्रिका झिंब्बावे विरुद्ध 2 कसोटी सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज कायले वेरेन याने या मालिकेसाठी माघार घेतली. त्यामुळे ईशानला नॉटिंघमशरकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. ईशान यॉर्कशायरनंतर 29 जून रोजी समरसेट विरुद्ध दुसरा आणि अंतिम सामना खेळताना दिसणार आहे.
नॉटिंघमशरने यॉर्कशायर विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. नॉटिंघमशर टीमसह जोडल्यानंतर ईशानने आनंद व्यक्त केला. “काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव मिळवण्यासाठी फार उत्साहित आहे. तसेच स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही चांगली संधी आहे. इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव मला फार कामी येईल , अशी प्रतिक्रिया ईशानने दिली.
तसेच ईशानबाबत नॉटिंघमशरचे हेड कोच पीटर मूर्स यांनी प्रतिक्रिया दिली. ईशानला काउंटी क्रिकेटमध्ये खेळायचं होतं. ईशानला संघात सहभागी केल्यानंतर फार आनंद होत आहे, असं पीटर मूर्स म्हणाले.
जर्सी नंबर 32, ईशान किशनचं पदार्पण
Ishan Kishan receives his Nottinghamshire cap from skipper Haseeb Hameed. Debut game incoming in County Cricket!🧢🔥 pic.twitter.com/sHYW6ffImo
— SunRisers OrangeArmy Official (@srhfansofficial) June 22, 2025
ईशान किशनची ‘फर्स्ट क्लास’ कामगिरी
दरम्यान ईशानने आतापर्यंत 58 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ईशानने या 58 सामन्यांमध्ये 3 हजार 447 धावा केल्या आहेत. ईशानने या दरम्यान 8 शतकं आणि 17 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच ईशानने विकेटकीपर म्हणून 118 कॅचेस आणि 11 स्टपिंग केल्या आहेत. तसेच ईशानने टीम इंडियाचं 2 टेस्टमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. आता ईशान या 2 सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
