सामन्यावेळी हात मिळवणं आवश्यक असतं का? काय सांगतो आयसीसीचा नियम
No Handshake Controversy: आशिया कप स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने बाजी मारली. पाकिस्तानला या सामन्यात डोकंच वर काढू दिलं नाही. तसेच हँडशेक न करता जागा दाखवून दिली. त्यामुळे पाकिस्तानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. पण सामन्यावेळी हात मिळवणं खरंच आवश्यक आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चला जाणून घेऊयात..

आशिया कप स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. दहशतवादाला प्रोत्साहन देण्याऱ्या पाकिस्तान संघाच्या चिंध्या उडवल्या. भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. इतकंच सामन्यात शक्य होईल तितका पाकिस्तानला इंगा दाखवण्याचा प्रयत्न केला. भारतीय कर्णधार आणि खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवणं टाळलं. सुरुवातीला सूर्यकुमार यादवने नाणेफेकीवेळी पाकिस्तानी कर्णधाराशी हात मिळवला नाही. तसेच सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू मैदानात आलेच नाहीत. तसेच हात मिळवणी केली नाही. त्यामुळे पाकिस्तानची संपूर्ण जगासमोर लाज गेली. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा प्रेझेंटेशन सेरेमनीसाठीही उपस्थित राहिला नाही. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने स्पष्ट केलं की, बीसीसीआय आणि टीम व्यवस्थापनाचा हा निर्णय होता. काही गोष्टी खेळ भावनेपेक्षा मोठ्या असतात. दुसरीकडे, पाकिस्तानात यावरून वादंग सुरु झाला आहे. असं असताना सामन्यावेळी हात मिळवणं गरजेचं असतं का? आयसीसीचा असा काही नियम आहे का? वगैरे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील.
हात मिळवणीप्रकरणी आयसीसीचा नियम काय सांगतो?
आंतरराष्ट्रीय सामने पाहात असताना तुमच्या एक बाब लक्षात आली असेल की, सामन्यानंतर फलंदाजी करणारा संघ मैदानात उतरतो आणि विरोधी संघाच्या खेळाडूंसोबत हात मिळवणी करतो. मैत्रिपूर्ण वातावरणात हा सामना संपला असं यातून दर्शवलं जातं. तसेच एकमेकांना प्रोत्साहन दिलं जातं. पण असाच आयसीसीचा नियम आहे का? तर तसं अजिबात नाही. आयसीसीच्या नियमावलीत हात मिळवणं अनिवार्य नाही. पण आयसीसीच्या नियमावलीत इतर गोष्टींचा उल्लेख केला आहे. यात सामन्यावेळी विरोधी संघाच्या खेळाडूंचा आणि पंचांचा मान राखला पाहीजे. त्यामुळेच सामन्यानंतर खेळाडू हात मिळवतात किंवा बॅट-ग्लव्ह्जने अभिवादन करतात.
आयसीसीच्या नियमानुसार, क्रिकेट खेळ भावनेतूनच खेळला पाहीजे. निष्पक्षपणे खेळण्याची जबाबदारी कर्णधारांची असते. विशेषतः ज्युनियर क्रिकेटमध्ये सर्व खेळाडू, पंच आणि शिक्षक, प्रशिक्षक आणि पालक यांच्यावर ही जबाबदारी असते. सामन्यात हातमिळवणी न केल्याने पाकिस्तानची पुरती लाज गेली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने भारतीय क्रिकेट संघावर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. ‘भारताने हस्तांदोलन करण्यास नकार देणं हा एक डाग आहे आणि त्याची सळ आयुष्यभर सहन करावी लागेल. यापूर्वीही युद्ध झाली आहेत. पण आम्ही हस्तांदोलन केले आहे. पहलगाम हल्ल्याबाबत भावना तीव्र असणं सहाजिकच आहे. पण मैदानात असताना खेळ खेळासारखा खेळला पाहीजे. भारताला युद्ध लढलं पाहीजे होतं. त्यांनी मागे फिरायला नको होतं. ‘
