आयसीसीकडून कसोटी क्रिकेटला मिळणार बुस्टर डोस, आता क्रिकेटपटू होणार मालामाल
गेल्या काही वर्षात कसोटी क्रिकेटची स्थिती एकदम वाईट झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर बरेच सल्ले मिळाल्यानंतर त्याला स्पर्धेचं स्वरुप प्राप्त झालं. दर दोन वर्षांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी होऊ लागली आहे. सध्या हे तिसरं पर्व असून आयसीसीने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे.

कसोटी क्रिकेटला गेल्या काही वर्षांत अच्छे दिन आले आहेत असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. झटपट फॉर्मेटमुळे कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. मात्र आयसीसीने त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं स्वरुप दिलं आणि कसोटी क्रिकेटचं रुपडं पालटलं. अंतिम फेरी खेळण्यासाठी संघांची चढाओढ सुरु झाली. त्यामुळे प्रत्येक कसोटीचं महत्त्व वाढलं आहे. पण क्रिकेटपटूंचं मानधन फारसं नसल्याने झटपट फॉर्मेटकडे कल असल्याचं दिसून आलं होतं. आता यावरही आयसीसीने तोडगा काढण्याचं ठरवलं आहे. कसोटी क्रिकेटसाठी एक वेगळा निधी तयार करण्याचा विचार केला जात आहे. यामुळे खेळाडूंचं मानधन वाढवण्यास मदत होईल. तसेच कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आयसीसी कसोटी क्रिकेटसाठी किमान 150 लाख अमेरिकन डॉलरचा वेगळा निधी तयार करणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या या प्रस्तावावर भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह आणि इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास खेळाडूंच्या मानधनात वाढ होईल. इतकंच काय विदेश दौऱ्यावर संघ पाठवण्यासाठी लागणारा खर्चही यातून भागणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजसारख्या क्रिकेट बोर्डांना मदत मिळेल. तसेच भविष्यात जास्तीत जास्त कसोटी क्रिकेट सामने पाहायला मिळतील. दुसरीकडे, आयसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत जय शाह यांचं नाव आघाडीवर आहे. सध्याचं गणित पाहता अध्यक्षपदाची माळ जय शाह यांच्याच गळ्यात पडेल असं दिसतंय. त्यांच्या कारकिर्दित हा निर्णय लागू होईल, असं दिसतंय.
कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा सध्या नऊ संघांना देण्यात आला आहे. भविष्यात यात वाढ होऊ शकते. नऊ संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा होते. वर्ल्डटेस्ट चॅम्पियनशिपचं हे तिसरं पर्व आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सध्या टॉपला आहेत. जर अशीच स्थिती राहिली तर अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल. पहिल्या पर्वात न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे तिसऱ्या पर्वात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर जेतेपद मिळवेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.
