श्रीलंका इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी ‘दोन’ बेन स्टोक्स हजर, व्हिडीओ पाहून ठरवा खरं कोण खोटं कोण ते
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने बऱ्यापैकी फाईट दिली आहे. असं असलं तर इंग्लंडने घेतलेली आघाडी मोडून काढताना चार विकेट्स गमावले आहेत. पण या सामन्यात खरी रंगत वाढली ती दोन बेन स्टोक्समुळे...! कसं काय ते जाणून घ्या

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु असून इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. पहिल्या डावात श्रीलंकेचा संपूर्ण संघ 236 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर इंग्लंडने 358 धावा केल्या आणि 122 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना श्रीलंकेचे चार खेळाडू तंबूत परतले. इंग्लंडचा संघ कर्णधार बेन स्टोक्सशिवाय मैदानात उतरला आहे. बेन स्टोक्स कर्णधार झाल्यापासून ही पहिलीच वेळ आहे. दुखापत झाल्याने बेन स्टोक्स या मालिकेला मुकला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी ओली पोपच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. असं असताना इंग्लंड श्रीलंकेच्या कसोटी सामन्यात दोन बेन स्टोक्सनी हजेरी लावली. आता तुम्हालाही प्रश्न हे दोन बेन स्टोक्स प्रकरण नेमकं आहे तरी काय? बेन स्टोक्स तर मालिकेत नाही मग मैदानात आला कसा? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. खरं तर दोन बेन स्टोक्स प्रकरणामुळे तुमचं मनोरंजन होईल.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामना सुरु असताना दुखापतग्रस्त बेन स्टोक्सने सामना पाहण्यासाठी हजेरी लावली. हा सामना पाहत असताना कॅमेऱ्याने आणखी एका बेन स्टोक्सला चित्रित केलं. त्यामुळे स्पेशल बॉक्समध्ये असलेला बेन स्टोक्स खरा की प्रेक्षकांमध्ये बसलेला बेन स्टोक्स खरा असा प्रश्न अनेकांना पडला. कारण प्रेक्षकांमध्ये बसलेली व्यक्ती बेन स्टोक्ससारखी हुबेहुब दिसत होती. अगदी बॉलिवूडच्या जुडवाँ,गोपी किशन चित्रपटासारखा.. खऱ्या बेन स्टोक्सनेही आपल्यासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या बेन स्टोक्सला पाहून आश्चर्य व्यक्त केलं. तसेच हात दाखवून दाद दिली.
TWO BEN STOKES….!!! 😂🔥
– What an entertaining moment. pic.twitter.com/vh6IW2KexM
— Johns. (@CricCrazyJohns) August 23, 2024
बेन स्टोक्सने इंग्लंड संघाची धुरा 2022 पासून हाती घेतली आहे. तेव्हापासून आतापर्यंत सर्वच कसोटी सामन्यात खेळला होता. पण पहिल्यांदाच कसोटी सामन्याला मुकला आहे. त्याचं आक्रमक नेतृत्व आणि बेझबॉल रणनितीमुळे सर्व जगाचं लक्ष त्याच्याकडे लागून असतं. पण हंड्रेड स्पर्धेत खेळताना हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आणि कसोटी मालिकेला मुकला. दरम्यान, इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यावर पकड मिळवली असून जिंकेल असंच दिसत आहे.
