
एसीसी मेन्स अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत दोन गट असून टॉपला असलेल्या दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यापैकी तीन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे. तर पाकिस्तानचा संघ गॅसवर आहे. या स्पर्धेत ब गटात नेपाळचा सामना बांगलादेशशी झाला. या सामन्यात बांगलादेशने नेपाळला 7 विकेटने मात दिली. तर श्रीलंकेचा सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यात श्रीलंकेने 2 विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यातील निकालामुळे ब गटातून बांग्लादेश आणि श्रीलंकेला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे. दोघांनी प्रत्येकी दोन सामन्यात विजय मिळवून 4 गुणांची कमाई केली आहे. तर नेपाळ आणि अफगाणिस्तानच्या खात्यात काहीच नाही. त्यामुळे साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकला किंवा हरला तरी काही फरक पडणार नाही. त्यामुळे अफगाणिस्तान आणि नेपाळचा या स्पर्धेतून पत्ता कट झाला आहे.
दुसरीकडे, अ गटात भारताने उपांत्य फेरीत जाग पक्की केली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने 4 गुणांसह उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. तर पाकिस्तान, युएई आणि मलेशियाचं गणित जर तर वर आहे. पाकिस्तान आणि युएई यांच्यातील विजयी संघ उपांत्य फेरीत जागा मिळवणारा दुसरा संघ असेल. तर भारत मलेशिया सामन्याचा फरक पडणार नाही. मलेशियाने सामना जिंकला तरी स्पर्धेतून बाद होणार आहे. तसं पाहिलं तर भारताला पराभूत करणं कठीण आहे. दुसरीकडे, पाकिस्तान युएई सामना करो या मरोची लढाई असेल. उपांत्य फेरीचे सामने 19 डिसेंबरला पार पडणार आहेत. तर अंतिम सामना 21 डिसेंबरला होईल.
भारताने शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तर ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी सामना होईल. भारत मलेशिया सामना 16 डिसेंबरला होणार आहे. हा सामना दुबईच्या सेवन्स स्टेडियममध्ये खेळला जाईल. भारताने यापूर्वी युएई आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पाकिस्तानला 90 धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीत जागा पक्की केली होती. आता या दुसरा संघ कोणता त्याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे.