T20I World Cup : रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, यूएईचा कॅप्टन हिटमॅनला पछाडण्याच्या मार्गावर

Most Sixes In T20Is : यूएईचा अनुभवी फलंदाज मोहम्मद वसीम टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच वसीम सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला सक्रिय फलंदाज आहे.

T20I World Cup : रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, यूएईचा कॅप्टन हिटमॅनला पछाडण्याच्या मार्गावर
Rohit Sharma Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 10, 2026 | 8:09 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात विजयी सुरुवात केली. भारताने यूएसएचा पराभत करत विजयी सलामी दिली. टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या हंगामात गतविजेता आणि यजमान म्हणून उतरली आहे. टीम इंडियाला या स्पर्धेत एका झटक्यात 3 वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. भारताला सर्वाधिक 3 ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. तसेच सलग दुसरी ट्रॉफी जिंकण्यासह मायदेशात वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी आहे. भारताने 2024 मध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. मात्र रोहितने त्यानंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

रोहितला निवृत्त होऊन आता जवळपास 2 वर्ष होतील. मात्र त्यानंतरही रोहितचे काही विक्रम अबाधित आहेत. मात्र रोहितचा एक वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात आहे. यूएईचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज मोहम्मद वसीम रोहितच्या वर्ल्ड रेकॉर्डच्या जवळ आहे. मोहम्मद वसीम याला रोहितचा टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात

रोहितच्या नावावर टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विश्व विक्रम आहे. तसेच रोहित 200 पेक्षा अधिक षटकार लगावणारा एकमेव फलंदाज आहे. रोहितने 159 सामन्यांमध्ये सर्वाधिक 205 षटकार लगावले आहेत. मोहम्मद वसीम याला रोहितला पछाडण्यासाठी किती षटकारांची गरज आहे? हे जाणून घेऊयात.

वसीमच्या नावावर किती षटकार?

यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीम याने टी 20i कारकीर्दीतील 94 सामन्यांमध्ये 193 षटकार लगावले आहेत. यूएईने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला. वसीमने या सामन्यात यूएईसाठी सर्वाधिक धावा केल्या. वसीमने 45 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह 66 धावा केल्या. वसीमच्या नावावर यासह 193 षटकारांची नोंद झाली.

वसीमला 13 षटकारांची गरज

आता वसीमला रोहितच्या नावावर असलेल्या टी 20i क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी 13 षटकारांची गरज आहे. यूएईला टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आणखी 3 सामने खेळायचे आहेत. वसीमची कामगिरी पाहता त्यासाठी ही कामगिरी सोपी नाही, मात्र त्याच्यासाठी ते अवघडही नाही. अशात आता मोहम्मद वसीम रोहितला पछाडण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.