रिंकु सिंहने 173 च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या धावा, पण शेवटच्या षटकात एक चूक भोवली आणि सामना गमावला
उत्तर प्रदेश प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या पात्रता फेरीच्या सामन्यात मेरठ मावरिक्सला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रिंकु सिंहने वादळी खेळी केली. पण शेवटच्या षटकात एक चूक संघाला महागात पडली आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

उत्तर प्रदेश प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या पहिल्या पात्रता फेरीच्या सामन्यात काशी रुद्रास आणि मेरठ मावरिक्स हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. अतितटीच्या सामन्यात कोण बाजी मारणार? अशी स्थिती होती. एक वेळ अशी होती की रिंकु सिंहचा संघ सहज जिंकेल. सामना मेरठ मावरिक्सच्या टप्प्यात होता. पण शेवटच्या षटकात रिंकु सिंहची एक चूक भोवली आणि मेरठ मावरिक्सला 5 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. रिंकु सिंहच्या संघाची थेट अंतिम फेरी गाठण्याची संधी हुकली. रिंकु सिंहने या सामन्यात आक्रमक खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मेरठ मावरिक्सने विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना मेरठ मेवरिक्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. संघाने 3 धावा असताना पहिली विकेट गमावली. तर स्वास्तिक चिकाराही 32 चेंडूत 25 धावा करू शकला. ऋतुराज शर्माने 65 धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. रिंकु सिंह उतरला तेव्हा संघाची स्थिती 13.4 षटकात 100 धावा आणि 3 विकेट अशी होती.
रिंकु सिंहने एका बाजूने मोर्चा सांभाळला आणि आक्रमण सुरु केलं. त्याने 23 चेंडूत 173.91 च्या स्ट्राईक रेटने 40 धावा केल्या. यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. रिंकु सिंह खेळपट्टीवर असेपर्यंत हा सामना पूर्णपणे मेरठ मावरिक्सच्या पारड्यात झुकलेला होता. शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती आणि रिंकु सिंह स्ट्राईकला होता. रिंकु सिंहने पहिल्या तीन चेंडूत 10 धावा ठोकल्या. त्यामुळे तीन चेंडूत 10 धावा अशी स्थिती आली. पण चौथ्या चेंडूवर रिंकु सिंह फसला. विशेष म्हणजे फुल टॉस चेंडूवर विकेट देऊन बसला. हा चेंडू खरं तर रिंकु सिंह क्षमता पाहता मैदानाबाहेर जायला हवा होता. पण तसं झालं नाही आणि विकेट गेली. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूत 4 धावा आल्या आणि मेरठ मावरिक्सने हा सामना 5 धावांनी गमावला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
मेरठ मावरिक्स (प्लेइंग इलेव्हन): स्वस्तिक चिकारा, ऋतुराज शर्मा, माधव कौशिक, रिंकू सिंग (कर्णधार), अक्षय दुबे (विकेटकीपर), रितिक वत्स, यश गर्ग, कार्तिक त्यागी, जीशान अन्सारी, विजय कुमार, विशाल चौधरी.
काशी रुद्रस (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक गोस्वामी, करण शर्मा (कर्णधार), भावी गोयल, उवैस अहमद (विकेटकीपर), शुभम चौबे, सक्षम राय, शिवा सिंग, कार्तिक यादव, शिवम मावी, अटल बिहारी राय, सुनील कुमार
