USA vs PAK : T20 WC मध्ये अमेरिकेचा पाकिस्तानवर विजय, या मॅचचा हिरो मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर कोण आहे?
USA vs PAK : आयसीसी T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये एका आश्चर्यकारक निकालाची नोंद झालीय. कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता ते घडलय. नवख्या अमेरिकेने क्रिकेटमधील बलाढ्य शक्ती समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तान क्रिकेटसाठी हा फार मोठा धक्का आहे. महत्त्वाच म्हणजे एक मुंबईकर या विजयाचा नायक ठरलाय.

आयसीसी T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झालीय. युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेने बलाढ्य पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. अमेरिकेसारख्या नवख्या टीमच्या या कामगिरीने सगळेच चकीत झाले आहेत. या मॅचमध्ये अमेरिकेच्या विजयाचा हिरो ठरलाय मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानवर हा विजय मिळवला. T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानला बसलेला हा सर्वात मोठा झटका आहे. कारण पाकिस्तानसोबत असं काही होईल, याची कोणीच कल्पना केली नव्हती. अमेरिकेच्या या विजयानंतर सोशल मीडियावर सौरभ नेत्रवाळकरचीच चर्चा आहे. लिंकडिन प्रोफाईलनुसार सौरभ नेत्रवाळकर ओरॅकल टेक्नी आहे.
सौरभ नेत्रवाळकर कॉम्प्युटर तज्ज्ञ असून तो कोड बनवण्याच काम करतो. सध्या सौरभ नेत्रवाळकर अमेरिकेत चर्चेत विषय बनलाय. टीम इंडिया विरुद्ध मॅच आधी त्याच्या एक सहकाऱ्याने ओरॅकल रोहित शर्माच्या टीम इंडिया विरुद्ध T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याच म्हटलं होतं. हा सौरभ नेत्रवाळकर कोण आहे? जाणून घेऊया.
मुंबईकर सौरभ नेत्रवाळकर कोण?
मुंबईत 16 ऑक्टोबर 1991 रोजी सौरभचा जन्म झाला. नेत्रवाळकर हा भारतीय वंशाचा अमेरिकन क्रिकेटर आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचा तो कॅप्टन होता. सौरभ नेत्रवाळकर भारतात भरपूर क्रिकेट खेळलाय. भारताच्या अंडर 19 टीममधून खेळलेल्या नेत्रवाळकर 2015 साली अमेरिकेत स्थायिक झाला. मुंबईकडून तो रणजी ट्रॉफी खेळला. नेत्रवाळकर केएल राहुल, मयंक अग्रवाल, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि संदीप शर्मा यांच्यासोबत क्रिकेट खेळलाय.
मुंबई विद्यापीठाशी काय कनेक्शन?
अमेरिकेत त्याला नेत्रा हे टोपण नाव आहे. लिंकडिन प्रोफाईलनुसार, प्रोफेशनल क्रिकेटर असलेला सौरभ नेत्रवाळकर ओरॅकलमध्ये काम करतो. 2016 मध्ये अमेरिकेतून त्याने कॉम्प्युटर सायन्स या विषयातून पदवी घेतली. मुंबई विद्यापीठातून 2013 साली पदवी घेतली आहे.
14 years later, Saurabh Netravalkar helps his side beat Pakistan at a Cricket World Cup… 👏🏻👏🏻 pic.twitter.com/1O8Qq0uRrp
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 6, 2024
सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?
अमेरिकेने पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. अमेरिकेने पहिली बॅटिंग करत 19 धावा केल्या. यूएसच्या ॲरॉन जोन्स आणि हरमीत सिंह या जोडीने सुपर ओव्हरमध्ये 18 धावा केल्या. यूएसएकडून सौरभ नेत्रवाळकरने सुपर ओव्हर टाकली. सौरभने 13 धावा देत 1 विकेट घेतली. यूएसएने सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला.
