वैभव सूर्यवंशीला पृथ्वी शॉ होण्याची भीती! संघात निवड होताच घेतला मोठा निर्णय
वैभव सूर्यवंशीकडे भारतीय क्रिकेट संघाचा उभरता तारा म्हणून पाहीलं जात आहे. वैभव सूर्यवंशीने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दमदार खेळी करून आपली धमक दाखवली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या चढत्या आलेखाला उतरती कला लागू नये म्हणून सूर्यवंशीने आतापासूनच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

अवघ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीचं कौतुक संपूर्ण क्रीडाविश्वात होत आहे. आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांना दिवसा तारे दाखवत शतकी खेळी केली. त्यामुळे वैभव सूर्यवंशीची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर असून अंडर 19 संघासोबत मालिका खेळण्यास गेला आहे. ही मालिका 27 जूनपासून सुरु होणार आहे. मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीचे जोरदार तयारी केली आहे. पण या दरम्यान त्याने एक मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. वैभव सूर्यवंशी क्रिकेट कारकीर्द पुढे नेण्यासाठी स्पेशल डाएट फॉलो करत आहे. वैभव सूर्यवंशीच्या सध्याच्या डाएट प्लानचा खुलासा त्याच्या वडिलांनी केला आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं आहे. वैभव सूर्यवंशी चिकट मटण आवडीने खातो. या शिवाय त्याला लिट्टी चोखाही खूप आवडतं. पण वैभव सूर्यवंशी आता लिट्टी चोखा खात नाही. वैभवच्या वडिलांनी दैनिक जागरणाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
वैभव सूर्यवंशीचा डाएट प्लान काय?
संजीव सूर्यवंशी यांनी सांगितलं की, वैभव सूर्यवंशी आता मोजून मापून खातो. तो आता जीभेवर संयम ठेवून डाएट करतो. यात लिट्टी चोखाला कोणतंही स्थान नाही. वैभव सूर्यवंशीला वजन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे त्याने आतापासूनच त्यावर कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी संयमित आहार घेणं खूपच महत्त्वाचं आहे. कारण वजन वाढलं तर भविष्यात क्रिकेट कारकीर्दीवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे डाएट फॉलो करून मैदानात एक्टीव्ह राहणं खूपच महत्त्वाचं आहे. काही क्रिकेटपटूंना वाढत्या वजनाचा फटका बसला आहे. पृथ्वी शॉलाही वजन कमी करण्याच्या अनेकांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तो देखील वजन नियंत्रणात आणून टीम इंडियात पदार्पणासाठी सज्ज आहे.
वैभव सूर्यवंशीच्या इंग्लंडमधील कामगिरीकडे लक्ष
वैभव सूर्यवंशीने अंडर 19 संघात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना शतक ठोकलं आहे. रेड बॉलचा सामना करत त्याने हे शतक ठोकलं. त्यानतंर आयपीएल 2025 मध्ये पदार्पण केल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकलं. आता इंग्लंडच्या भूमीवर कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. इंग्लंडच्या भूमीवर त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याची कामगिरी दमदार ठरली तर त्याला टीम इंडियाचं लवकरच उघडू शकतं.
