
विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला दिवस फलंदाजांनी आपल्या नावावर केला. पहिल्याच दिवशी 24 डिसेंबरला तब्बल 22 फलंदाजांनी शतक झळकावलं. या 22 खेळाडूमध्ये टीम इंडियासाठी खेळणाऱ्यांचाही समावेश होता. रोहित शर्मा, विराट कोहली, ईशान किशन आणि वैभव सूर्यवंशी यांनी शतक झळकावलं. तसेच इतर 18 फलंदाजांनीही शतक ठोकलं. मात्र रोहित आणि विराट या दोघांनी भाव खाल्ला. दोघांनीही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अनेक वर्षांनी कमबॅक केलं. शतक करत कमबॅक केल्याने या दोघांची चर्चा पाहायला मिळाली. मात्र प्रसिद्धीपासून दूर असलेल्या 1 फलंदाजाने रोहित आणि विराटला पछाडलं.
रोहित शर्मा याने मुंबईसाठी सिक्कीम विरुद्ध दीडशतकी खेळी केली. रोहितने या सामन्यात 155 धावांची खेळी केली. रोहितच्या या खेळीमुळे मुंबईने विजयी सलामी दिली. तर विराटने दिल्लीसाठी शतक ठोकलं. विराटच्या 131 धावांच्या जोरावर दिल्लीने आंध्रप्रदेशवर विजय मिळवला. मात्र बिहार आणि झारखंड टीमने धमाका केला.
वैभव सूर्यवंशी याच्या बिहार टीमने अरुणाचल प्रदेश विरुद्ध कहर केला. बिहारने लिस्ट ए क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला. बिहारने लिस्ट ए क्रिकेटमधील एका सामन्यात सर्वाधिक 574 धावा केल्या. वैभवने या सामन्यात अवघ्या 36 चेंडूत शतक झळकावलं. वैभव यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला.
बिहारसाठी वैभव व्यतिरिक्त कॅप्टन सकीबुल गनी याने 32 चेंडूत शतक झळकावलं. सकीबुल यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला. बिहारसाठी वैभव आणि सकीबुल व्यतिरिक्त आयुष लोहारुका यानेही 116 धावांची खेळी केली.
झारखंडसाठी कॅप्टन इशान किशन याने कर्नाटक विरुद्ध 33 चेंडूत शतक झळकावलं. इशान यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. देवदत्त पडीक्कल याने झारखंड विरुद्ध 147 धावांची चाबूक खेळी करत कर्नाटकला विजयी केलं.
ओडीशाच्या स्वास्तिक सामल याने कमाल केली. स्वास्तिकने सौराष्ट्र विरुद्ध द्विशतक झळकावलं. स्वास्तिकने 169 बॉलमध्ये 212 रन्स केल्या. स्वास्तिकने या खेळीत 21 चौाकार आणि 8 षटकार लगावले. स्वास्तिकच्या खेळीच्या जोरावर ओडीशाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 345 धावांपर्यंत मजल मारली. मात्र सौराष्ट्रने हे आव्हान पूर्ण केलं. त्यामुळे स्वास्तिकची द्विशतकी खेळी व्यर्थ ठरली.