VHT Final : कर्नाटकने पाचव्यांदा उंचावली विजय हजारे ट्रॉफी, विदर्भावर 36 धावांनी मात, करुन नायरला दुहेरी झटका
Karnataka vs Vidarbha Vijay Hazare Trophy Final Match Result : कर्नाटकाने विदर्भावर अंतिम सामन्यात 36 धावांनी मात केली आणि पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी उंचावली.

कर्नाटक क्रिकेट संघाने विजय हजारे ट्रॉफी उंचावली आहे. कर्नाटकाने मयंक अग्रवाल याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे. कर्नाटकाने विदर्भावर अंतिम सामन्यात 36 धावांनी विजय मिळवलाय. कर्नाटकाने विदर्भाला विजयासाठी 349 धावांचं आव्हान दिलं होतं. विदर्भाने जोरदार प्रत्युत्तर देत 300 पार मजल मारत होती. मात्र कर्नाटकाच्या गोलंदाजांनी विदर्भाला 48.2 ओव्हरमध्ये 312 धावांवर रोखलं आणि विजय मिळवला. या पराभवासह विदर्भाचा कर्णधार करुण नायर याला हा दिवसभरात दुसरा झटका लागला. करुण नायरची आधी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र निवड समितीने त्याला डावललं.
ध्रुव शोरेची शतकी खेळी व्यर्थ
विदर्भासाठी ओपनर ध्रुव शोरे याने सर्वाधिक धावा केल्या. ध्रुवने शतकी खेळी केली. मात्र थोडक्यासाठी त्याची शतकी खेळी व्यर्थ ठरली. ध्रुवने 111 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्ससह 110 रन्स केल्या. हर्ष दुबे याने 30 बॉलमध्ये 63 रन्स केल्या. कर्णधार करुण नायर याच्यासह इतर फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. कर्नाटकाकडून वासुकी कौशिक, प्रसिध कृष्णा आणि अभिलाष शेट्टी या त्रिकुटाने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक राज याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
कर्नाटकची बॅटिंग
दरम्यान त्याआधी कर्नाटकने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 348 धावा केल्या. कर्नाटकासाठी समरण रवीचंद्रन याने सर्वाधिक 101 धावा केल्या. तर अभिनव मनोहर याने 79 तर क्रिष्णन श्रीजीथ याने 78 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनी दिलेल्या योगदानाच्या मदतीने कर्नाटकाने 348 धावांपर्यंत मजल मारली. विदर्भाकडून दर्शन नळकांडे आणि नचिकेत भुते या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर यश ठाकुर आणि यश कदम या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
कर्नाटकचा अंतिम सामन्यात विजय
𝗞𝗮𝗿𝗻𝗮𝘁𝗮𝗸𝗮 𝗔𝗿𝗲 𝗧𝗵𝗲 #𝗩𝗶𝗷𝗮𝘆𝗛𝗮𝘇𝗮𝗿𝗲𝗧𝗿𝗼𝗽𝗵𝘆 𝗖𝗵𝗮𝗺𝗽𝗶𝗼𝗻𝘀! 🏆 👏
Their 5⃣th Final & it’s their5⃣th Title! 🙌 🙌
Karnataka beat the spirited Vidarbha side 36 by runs to win the #Final! 👌 👌
Scorecard ▶️ https://t.co/ZZjfWXaajB @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Y7z0Pcho6w
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 18, 2025
कर्नाटक प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनिश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, हार्दिक राज, प्रसीद कृष्णा, वासुकी कौशिक आणि अभिलाष शेट्टी.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : करुण नायर (कर्णधार), ध्रुव शोरे, यश राठोड, जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, अपूर्व वानखडे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, यश कदम, दर्शन नळकांडे आणि यश ठाकूर.