Hardik Pandya : 9 षटकार-2 चौकार, हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका शर्मासमोर 75 धावांची स्फोटक खेळी
Hardik Pandya VHT : हार्दिक पंड्या याने गुरुवारी राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये चंडीगडच्या गोलंदाजांची पिसं काढली. हार्दिकने या सामन्यात 75 धावांची फायर खेळी केली.

भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी आणि स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत धुमधडाका कायम आहे. हार्दिकने अवघ्या काही दिवसांआधी या स्पर्धेत शतक झळकावलं होतं. हार्दिकचं ते लिस्ट ए क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक ठरलं होतं. हार्दिकने हाच तडाखा चंडीगड विरुद्धही कायम ठेवला. हार्दिकने बडोदासाठी खेळताना चंडीगड विरुद्ध धमाका केला. हार्दिकने राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये झंझावाती अर्धशतक झळकावलं. विशेष म्हणजे हार्दिकच्या या सामन्याला त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा ही स्टेडियममध्ये उपस्थित होती. हार्दिकने माहिकासमोर चाबूक खेळी करत तिचं पुन्हा एकदा मन जिंकलं.
हार्दिकची तडाखेदार खेळी
हार्दिक पंड्याने या सामन्यात अवघ्या 31 चेंडूत 75 धावा केल्या. हार्दिकने सहाव्या स्थानी येत ही खेळी केली. हार्दिकने 75 पैकी 62 धावा या फक्त षटकार आणि चौकारांच्या मदतीने केल्या. हार्दिकने या खेळीत 9 षटकार आणि 2 चौकार लगावले. हार्दिकने 240 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. हार्दिकने या दरम्यान अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावलं. हार्दिक मारत असलेला प्रत्येक फटक्याचा माहिका स्टेडियममधून आनंद घेत होती. हार्दिकची ही 50 पेक्षा अधिक धावा करण्याची सलग दुसरी वेळ ठरली.
हार्दिकने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत यंदाच्या मोसमातील आपला पहिल्यात सामना धमाका केला होता. हार्दिकने 92 बॉलमध्ये 133 रनस केल्या होत्या. हार्दिकने त्या सामन्यात 8 चौकार आणि 11 षटकार लगावले होते.
हार्दिकने अशाप्रकारे आतापर्यंत या स्पर्धेतील अवघ्या 2 सामन्यांमध्ये 20 षटकार आणि 11 चौकार लगावलेत. हार्दिकने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी अशी कामगिरी करणं भारतीय संघासह चाहत्यांसाठी सुखावणारं आहे. टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड विरुद्ध 5 टी 20i सामने खेळणार आहे. हार्दिक त्या मालिकेचा भाग असणार, हे निश्चित आहे.
प्रियांशु मोलियाचा शतकी तडाखा
बडोद्यासाठी हार्दिक व्यतिरिक्त प्रियांशू मोलिया यानेही धमाका केला. प्रियांशु याने शतक झळकावलं. प्रियांशुने 106 बॉलमध्ये 113 रन्स केल्या. प्रियांशुने या खेळीत 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर जितेश शर्मा याने 33 बॉलमध्ये 73 रन्स केल्या. प्रियांशु, हार्दिक आणि जितेश या त्रिकुटाच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर बडोदा संघाने 391 धावांपर्यंत मजल मारली. मात्र बडोदा संघाला पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. चंडीगड संघाने बडोदाला 49.1 ओव्हरमध्ये गुंडाळलं.
चंडीगडचा 149 धावांनी धुव्वा
दरम्यान बडोदा टीमने चंडीगडला 392 धावांचा पाठलाग करताना 40 ओव्हरमध्येच गुंडाळलं. चंडीगडला 242 धावाच करता आल्या. बडोदा संघाने अशाप्रकारे हा सामना 149 धावांनी जिंकला.
